मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अटर्नी)

Adv.Saurabh Rajput
0

 


मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अटर्नी)



“मुखत्यारपत्र एक कायदेशीर दस्तऐवज आहे जो आपल्या वतीने आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी एखाद्याला अधिकार देण्यासाठी वापरला जातो.

 मुखत्यारपत्र हे एक साधन आहे ज्याचा वापर प्रमुखच्या वतीने कायदेशीररीत्या कार्य करण्यासाठी एखाद्याला अधिकार देण्यासाठी केला जातो.” मुखत्यार , पॉवर ऑफ ऍटर्नी, ज्याला मराठी मध्ये कुलमुखत्यारपत्र, तर काही ठिकाणी वटमुखत्यारपत्र असे संबोधले जाते. 

एखाद्या व्यक्तीने आपली शेतजमीन, वास्तू, व्यवसाय इ. मालमत्तेसंबंधी आपले काम पाहण्यासाठी दुसऱ्या एखाद्या इसमास कायदेशीररीत्या प्राधिकृत केल असेल, तर कायद्याच्या परिभाषेत अशा इसमास सामान्यपणे ‘मुखत्यार’ असे म्हणतात. 

पॉवर ऑफ ऍटर्नी ऍक्ट १८८२ आणि कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट १८७२ ह्या तो ऍक्ट मध्ये पॉवर ऑफ ऍटर्नी बद्दलच्या तरतुदी आढळून येतात. 

आपल्या वतीने ठराविक गोष्टी करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीस दिलेले अधिकार पत्र म्हणजे पॉवर ऑफ ऍटर्नी अशी व्याख्या १८८२ च्या कायद्यामध्ये केलेली आढळते.

 मात्र पॉवर ऑफ ऍटर्नी देणारा आणि घेणारा ह्यांचे हक्क, कर्तव्ये, अधिकार ह्या बाबतीतल्या सर्व तरतुदी ह्या कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधील कलम - १८२ ते २३८ मध्ये आढळून येतात. ह्या कायद्याप्रमाणे जी व्यक्ती पॉवर ऑफ ऍटर्नी देते त्या व्यक्तीस "प्रिन्सिपल" तर जी व्यक्ती पॉवर ऑफ ऍटर्नी लिहून घेते त्या व्यक्तीस "एजंट" म्हटले जाते. इंग्रजी मध्ये त्याला ‘अटर्नी’ किंवा ‘एजंट’ म्हणतात. 

जेव्हा एक इसम हा दुसऱ्या इसमास मुखत्यार म्हणून नेमतो, तेव्हा ज्या दस्तान्वये मुखत्यार नेमला जातो, त्यास ‘मुखत्यारपत्र’ किंवा इंग्रजीत ‘पॉवर ऑफ अटर्नी’ म्हणतात. मुखत्यारपत्र कायदेशीर दस्तऐवज असतो. त्याला योग्य तो मुद्रांक लावावा लागतो. जो व्यक्ती मुखत्यारपत्र देते, त्या व्यक्तीने मुखत्यारपत्रावरची आपली सही, दंडाधिकारी, लेखप्रमाणक (नोटरी) किंवा इतर अधिकृत अधिकाऱ्यासमोर करावी लागते.

 मुखत्यार म्हणून नेमलेल्या इसमास कोणत्या प्रकारची कामे करण्याचे अधिकार दिले आहेत, ते मुख्यत्यापत्रवरून समजते. मुखत्यार या अधिकाराने त्या इसमाने जर मुखत्यारकर्त्याचे येणे वसूल केले व त्याबद्दल पावती दिली, तर कायदेशीर रीत्या ऋणको कर्जमुक्त होतो. मुखत्यारपत्रान्वये जे अधिकार दिलेले असतात, ते मुखत्यार व्यक्तीने तंतोतंत पाळावयाचे असतात.

 मुखत्यार करीत असलेली सर्व कामे जर मुखत्यारपत्राप्रमाणेच केलेली असतील, तर ती कामे जर मुखत्यारपत्रकर्त्यावर बंधनकारक असतात. ती कामे आपण स्वतः केली नव्हती, असे त्याला म्हणता येत नाही . त्याचप्रमाणे मुखत्यार म्हणून काम करत असता संबंधित मुखत्याराला काही नुकसान पोहोचले अगर तोशीस लागली, तर त्याची भरपाई मुखत्यारपत्रकर्त्याला द्यावी लागते. मुखत्यारपत्र दोन प्रकारचे असते : (१) सर्वसामान्य व (२) विशिष्ट. ज्यावेळी विशिष्ट कामाकरिताच मुखत्यारास अधिकार दिला असेल, त्यावेळी मुखत्याराने तेवढे विशिष्ट कामच करावयाचे असते. उदा., एखाद्या दस्तावर सही करणे किंवा त्याची नोंदणी करणे. त्याव्यतिरिक्त इतर कामे केल्यास त्यास मुखत्यार वैयक्तिकरीत्या जबाबदार राहतो मुखत्यारपत्रकर्ता जबाबदार रहात नाही. एखादे विशिष्ट काम न देता जर सामान्यतः सर्व कामे दिली असतील, तर त्याला सर्वसामान्य मुखत्यारपत्र म्हणतात. उदा. ‘ब’ ला ‘अ’ तर्फे न्यायालयात दावा लावायचा असेल तर, सर्वसामान्य मुखत्यारपत्राची जरुरी असते. मुखत्यारपत्राच्या आधारे जर स्थावर मिळकतीवर काही बोजा निर्माण करावयाचा असेल किंवा स्थावर मिळकतीसंबंधी काही व्यवहार करावयाचा असेल, तर असे मुखत्यारपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागते. मुखत्यारपत्र विषय खूप मोठा आणि जरा विश्वासाशी संबंध असलेला असल्यामुळे थोडक्यात पण महत्वाच्या तरतुदी आपण बघूया. 


१. कायद्याने सज्ञान असलेली आणि मानसिक संतुलन न ढळलेली कोणतीही व्यक्ती मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ऍटर्नी) देऊ शकते आणि घेवू शकते. लिहून देणारे आणि घेणारे एका पेक्षा जास्त व्यक्ती असू शकतात, त्याला जॉईन्ट पॉवर ऑफ ऍटर्नी म्हणतात. मुखत्यारपत्र वरती दोन साक्षीदारांच्या सह्या असणे व्यवहारात उपयोगी पडू शकते. 

२. मुखत्यारपत्र मध्ये जी कामे करण्याचा अधिकार एजंटला दिला असतो, तेवढीच कामे त्याला करता येतात. थोडक्यात शब्दांच्या पलीकडले अर्थ एजंटला काढता येत नाहीत, जेवढे आणि जसे सांगितले तसेच काम एजंटने करणे अपेक्षित असते. ह्यालाच 'स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन' असे कायद्याने म्हणतात. उदा . मुलाने वडिलांना बँकांचे व्यवहार करण्याची, त्याच्या नावावर असलेल्या जागेचे टॅक्स, लाईट बील वगैरे भरण्याची पॉवर ऑफ ऍटर्नी दिली असेल, पण जागा भाड्याने देण्यासाठी करार करण्याचा अधिकार दिला नसेल, तर वडिलांना अश्या करारावर मुलाच्या वतीने सही करता येत नाही. सबब मुखत्यारपत्र करताना त्यातील अटी - शर्ती काळजीपूर्वकच लिहाव्यात. 

३. एजंट जी कामे मुखत्यारपत्र होल्डर म्हणून करतो, ती कामे आणि त्यांचे परिणाम 'प्रिन्सिपल' वर बंधनकारक असतात, थोडक्यात 'प्रिन्सिपल' ने स्वतःच ती कामे केली आहेत असे समजले जाते. मात्र एजंटने स्वतःहून कोणाची फसवणूक केल्यास किंवा बेकायदेशीर कामे केल्यास त्याची जबाबदारी 'प्रिन्सिपलवर येत नाही. एजंटने स्वतःच्या फायद्यासाठी काम न करता 'प्रिन्सिपलच्या' भल्यासाठी काम करणे अपेक्षित असते. 

४. जागेचे खरेदी विक्री करण्यासाठी किंवा जागेतील मालकी हक्क तबदील करण्यासाठी रजिस्टर्ड मुखत्यारपत्र गरजेची असते, इतर बाबतीत उदा. बँकांचे व्यवहार इ. तशी गरज नसते, नोटराइज्ड सुद्धा चालते. महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्टच्या परिशिष्ट ४८ मध्ये वेगवेळ्या दस्तांसाठी स्टँम्प ड्युटीसंदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. सध्या कुठल्याही दस्तांसाठी कमीतकमी र. ५००/- एवढी स्टँम्प ड्युटी आकारली जाते. कुठलाही मोबदला न घेता किंवा दर्शविता जागा विकण्यासाठी किंवा अन्य मार्गाने तबदील करणायसाठी जर का 'प्रिन्सिपलने' त्याच्या आई, वडील, भाऊ, बहीण, वैवाहिक जोडीदार, स्वतःचा मुलगा / मुलगी, नातवंडे किंवा वैवाहिक जोडीदाराचे आई, वडील, भाऊ किंवा बहीण, ह्या पैकी कोणालाही मुखत्यारपत्र दिल्यास त्याला केवळ र. ५००/-ची स्टँम्प ड्युटी लागू होते. परदेशामध्ये वकिलातीसमोर केलेली मुखत्यारपत्र येथे विहित प्रोसिजर केल्यानंतर इकडे वापरता येते.

 ५. मुखत्यारपत्र होल्डर म्हणजेच एजंट हा दुसऱ्या कोणाला त्याचे अधिकार तबदील करू शकत नाही म्हणजेच त्याच्या वतीने परत मुखत्यारपत्र देऊ शकत नाही. 

६.दिवाणी कोर्ट प्रकरणांमध्ये मुखत्यारपत्र वापर खूप प्रमाणात होतो. दावा दाखल करण्यासाठी, जबाब दाखल करण्यासाठी , साक्ष देण्यासाठी मुखत्यारपत्र दिली जाते. मात्र ज्या गोष्टींची एजंटला वैयत्तिक माहिती आहे, तेवढ्या बाबतीतच एजंट, प्रिन्सिपलच्या वतीने कोर्टात साक्ष देऊ शकतो असा निकाल मा. सर्वोच्च न्यायालायने जानकी वासुदेव भोजवानी विरुद्ध इंडस इंड बँक ह्या प्रकरणामध्ये दिला आहे. (ए आय आर २००५ एस सी ४३९) ७. मुखत्यारपत्र रद्द कधी होते ? जर का प्रिन्सिपल किंवा एजंट ह्यांचा मृत्यू झाला किंवा दोघांपैकी कोणी एक दिवाळखोर झाले किंवा कोणाचे मानसिक संतुलन ढळले तर मुखत्यारपत्र रद्द होते. त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी किंवा कामासाठी मुखत्यारपत्र दिली असेल आणि असा कालावधी किंवा काम संपल्यानंतर मुखत्यारपत्र रद्द होते. प्रिन्सिपल आणि एजंट हे परस्पर संमतीने मुखत्यारपत्र रद्द करू शकतात. तसेच एजंट देखील प्रिन्सिपलला कळवून मुखत्यारपत्र रद्द करू शकतो. कोर्टामध्ये बरेच वेळा मुखत्यारपत्र रद्द करता येते की नाही ह्यावर वाद चालू असतात. काही वेळा मुखत्यारपत्र " इररिव्होकेबल पॉवर ऑफ ऍटर्नी" किंवा "कधीही रद्द न होणारे मुखत्यारपत्र " असे लिहिलेले असते. मात्र कायद्यामध्ये असा कोणताही दस्त नाही की जो रद्दबातल होऊ शकत नाही, अर्थात त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता होणे गरजेचे असते. जर का मुखत्यारपत्र मुळे एजंटला काही हक्क (इंटरेस्ट ) प्राप्त झाला असेल तर पॉवर ऑफ ऍटर्नी रद्द करता येत नाही आणि हक्क प्राप्त झाला की नाही हे कोर्टामध्ये सिद्ध होणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे मुखत्यारपत्र रद्द करण्याआधी जाहीर नोटीस किंवा वकीलामार्फत नोटीस देण्याची पद्धत आहे. परंतु जेव्हा मुखत्यारपत्र रजिस्टर्ड केलेली असते, तेव्हा केवळ नोटीस देऊन असा दस्त रद्द होतो का ह्या बाबतीत दुमत होऊ शकते. कारण कुठलाही रजिस्टर्ड दस्त हा परस्पर संमतीने किंवा कोर्टाच्या आदेशानेच रद्द होऊ शकतो असा कायदा आहे. 


७. पॉवर ऑफ ऍटर्नी आणि मालकी हक्क खूप लोकांचा हा गैरसमज आहे की मुखत्यारपत्र लिहून दिली की जागेचा मालकी हक्क देखील लिहून दिला, मात्र तसे नसते. जागेचे खरेदी खत करण्यासाठी दिलेली मुखत्यारपत्र आणि जागा खरेदी घेणाऱ्याला खरेदी खताएवजी मुखत्यारपत्र लिहून देणे ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. काही भागामध्ये 'सेल -पॉवर ऑफ ऍटर्नी' हा प्रकार चालतो, म्हणजे काय की जागा विकताना खरेदी घेणाऱ्याकढून जागा मालक पूर्ण पैसे घ्यायचे, मात्र रीतसर खरेदी खत न करता त्याला मुखत्यारपत्र लिहून द्यायची. पण ह्यामुळे मालकी हक्क काही तबदील होत नाही आणि ह्यामध्ये खूप गैरप्रकार झाले होते. सबब अखेर मा. सर्वोच्च न्यायालयाने 'सूरज लॅम्प इंडस्ट्री विरुद्ध हरियाणा राज्य' ह्या याचिकेवर २००९ आणि २०११ मध्ये निकाल देऊन हे स्पष्ट केले की केवळ अश्या मुखत्यारपत्र च्या आधारावर जागा विकत घेणाऱ्याला जागेमध्ये मालकी हक्क मिळत नाही, केवळ नोंदणीकृत खरेदीखतानेच जागेमध्ये मालकी हक्क प्राप्त होतो आपल्याकडे देखील असे प्रकार चालतात, हे दिसून येते. असा हा मुखत्यारपत्र चा दस्त खूप महत्वाचा आहे, उपयोगी आहे, परंतु दुधारी अस्त्र सारखा आहे. परस्पर विश्वास हा तर कुठल्याही व्यवहाराचा पाया आहे, जो ह्या दस्ताबाबत सुद्धा लागू होतो
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads