डीड ऑफ अपार्टमेंट तसेच खरेदीखतचा दस्त नोंदणी करणे.

Adv.Saurabh Rajput
0


डीड ऑफ अपार्टमेंट / सेल डीड ऑफ अपार्टमेंट खरेदीखतचा दस्त नोंदणी कार्यालयात नोंदणी करणे.




मित्रांनो आज आपण माहिती बघू डीड ऑफ अपार्टमेंट / सेल डीड ऑफ अपार्टमेंट / खरेदीखतचा दस्त नोंदणी कार्यालयात कसा नोंदणी केला जातो. जसे आपण बक्षिसपत्र  किंवा इतर दस्त नोंदणी कार्यालयात नोंदणी करतो त्याच प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटचा दस्त देखील दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात नोंदणी करावा लागतो.


दस्तांची नोंदणी ही दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात नोंदणी अधिनियमाप्रमाणे होत असते. जो कोणता कायदेशीर दस्त असेल ज्याची नोंदणी करणे नोंदणी कायद्याने बंधनकारक आहे अशा दस्तांची नोंदणी दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात करावी लागते. त्यामुळे तो दस्त कायदेशीर होतो व त्या दस्तास कायद्याचे संरक्षण प्राप्त होते. त्यामुळे डीड ऑफ अपार्टमेंट या दस्ताची देखील नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालय करावी लागते.


सर्वात आधी आपण डीड ऑफ अपार्टमेंट किंवा खरेदीचा  जो दस्त नोंदणी करत आहोत त्याची स्टॅम्प ड्यूटी आणि नोंदणी फी किती लागेल ती काढून घ्यावी. त्यासाठी आधी त्या स्थावर मिळकतीचे सरकारी मूल्यांकन (Government Valuation) काढून घ्यावे लागेल. सरकारी किंमत ही 7/१२ उतारा किंवा सिटी सर्व्हे उतारा जो लागू असेल त्यावरून निघेल.


आपण स्टँप ड्युटी ची रक्कम व नोंदणी फी किती लागेल ही माहिती नोंदणी कार्यालयातून काढू शकतो किंवा IGR संकेतस्थळावरून ऑनलाइन देखील काढू शकतो.


त्यानंतर आपसात जी मोबदल्याची किंमत ठरली असेल ती किंवा सरकारी किंमत (Govenment Valuation)  यामध्ये जी रक्कम जास्त असेल त्यावर स्टॅम्प ड्यूटी लागते.


 मुद्रांक शुल्क रक्कम आपण IGR संकेतस्थळा वरून ऑनलाईन किंवा नोंदणी कार्यालयातून काढू शकतो.


डीड ऑफ अपार्टमेंट नोंदणी करण्यासाठी आपल्याला स्टॅम्प ड्यूटी काढावी लागते, नोंदणी फी काढावी लागते, दस्त हाताळणी शुल्क पर पेज याप्रमाणे काढावी लागते. ऑनलाईन डेटा एन्ट्री करावी लागते. दस्त नोंदणी कमी हा खर्च येतो व याव्यतिरिक्त दस्त नोंदणी करणार वकील किंवा वेंडर यांची फी लागेल.


डिड ऑफ अपार्टमेंट नोंदणीकामी आपल्याला पुढील कागदपत्रे लागतात. सदर कागदपत्रे ही त्या दस्ता सोबत जोडावे लागतात आणि दस्तामध्ये त्या बाबत नमूद देखील करावे लागते. यासाठी आपल्याला संबंधित बिल्डिंग ज्या प्लॉट जागेवर उभी आहे त्या जागेचा चालूचा डिजिटल 7/१२ उतारा किंवा सिटी सर्व्हे उतारा जो लागू असेल तो लागेल. जो मिळकत विक्री करत आहे त्याच्या मालकी हक्का बाबत पुरावा, जसे जुने खरेदी, मालकी हक्काचा जो काही दस्त असेल तो लागेल किंवा त्याबाबत नोंद किंवा सूची 2 लागेल, संबंधित बिल्डिंग चे Commencement सर्टिफिकेट, Complition सर्टिफिकेट, मंजूर लेआऊट, मंजूर नकाशा, बिनशेती परवानगी, Approved बिल्डिंग प्लॅन, बिल्डिंग किंवा अपार्टमेंटचे मागील काही व्यवहार झालेले असतील तर त्या बाबत सूची दोन (इंडेक्स दोन) ची नक्कल. काही शेतसारा किंवा टॅक्स भरण्याबाबत पावती असेल तर ती. जर जुनी मिळकत असेल तर त्या मालकाचे नावाचे चालुचे लाईटबिल, आणि टॅक्स पावती घ्यावी. कारण त्यावरून समजत असते की तो मालक त्या अपार्टमेंट चा टॅक्स व लाईटबिल भरत आहे म्हणजे तो  तेथे  रहिवास करत आहे. पैसे दिल्याबाबत भरणा पावती केली असेल किंवा पैसे दिल्याबाबत चेक, डी.डी, ऑनलाईन पैसे दिलेले असतील तर त्या बाबत transaction नंबर वगैरे जे काही असतील ते लागतील. दस्तामधील जे पक्षकार असतील लिहून घेणार, लिहून देणार, साक्षीदार यांचे ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे लागतील आणि त्याबाबत दस्ता मध्ये नमूद करून ते दस्तास लावावे लागतील. त्यानंतर मूल्यांकन, स्टॅम्प ड्यूटी आणि नोंदणी फी, दस्त हाताळणी शुल्क (DHC - डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस चे चलन) भरल्या बाबत चलन पावती लागेल. या व्यतिरिक अजून काही NOC, बँक NOC, किंवा त्या जागे किंवा मिळकती संदर्भात महसूल / शासनाचे आदेश असतील वगैरे असतील तर ते संबंधित दस्त लागतात. दस्ताचा नीट ड्राफ्ट तयार करून त्यामध्ये या सर्व दस्तांचा उल्लेख करावा आणि सदर कागदपत्रे डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता सोबत जोडावे.


जुन्या मालकाचा किंवा जो व्यक्ती मिळकत विक्री करत आहे त्याच्या मालकी हक्काचा जो काही दस्त असेल तो नीट तपासावा कारण आपल्याला बरीच माहिती त्या दस्तामधून समजेल. बरेच महत्वाचे कागदपत्रे त्या दस्ताला जोडलेले असतील व त्या बाबत त्या दस्ता मध्ये शक्यतो नमूद असते. त्यामुळे आताचा नवीन दस्त बनविणे सोप्पे होते.


त्यानंतर सदर दस्ताची ऑनलाइन डेटा एन्ट्री करावी लागते. सदर डेटा एन्ट्री आपण, घरून तसेच आपल्या कार्यालयातून किंवा कुठून पण ऑनलाईन करू शकतो. महाराष्ट्र शासन व नोंदणी विभागाने ही सेवा आता ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे.


डीड ऑफ अपार्टमेंट तसेच खरेदीखताच्या ड्राफ्ट मध्ये काय काय नमूद असावे ते बघू. सदर दस्तामध्ये मूल्यांकन विभाग, मूल्यांकन, नोंदणी फी, स्टॅम्प ड्यूटी या बाबत माहिती नमूद असते. त्याचप्रमाणे सरकारी मूल्यांकन व आपसातील ठरलेली रक्कम या बाबत नमूद असते. ही माहिती दस्ताच्या सुरवातील पहिल्या पानावर सर्वात वर नमूद असते. त्यानंतर दस्तामध्ये तारीख, वार, ठिकाण, दस्त कोठे नोंदणी केला जात आहे या बाबत माहिती असते. त्यानंतर लिहून घेणार व लिहून देणार यांची सपूर्ण माहिती, जसे नाव, वय, पत्ता, धंदा, काय काम करतात ते, आधार, पॅन, ओळखपत्र, पत्ता, मोबाईल नंबर वगैरे नमूद करावे. ही माहिती नमूद केल्यावर मिळकतीचे वर्णन नमूद करावे लागते. मिळकतीच्या चतु: सिमा नमूद कराव्या लागतात. मिळकतीचे वर्णन आणि चतु: सिमा या दोन प्रकारे नमूद होतात एक म्हणजे बिल्डिंग ज्या जागेवर उभी आहे तिचे वर्णन आणि चतु:सीमा आणि दुसरे म्हणजे त्या अपार्टमेंट / फ्लॅट मिळकतीच्या चतु:सीमा नमूद असतात. मिळकतीच्या वर्णनामध्ये गट नंबर / सर्व्हे नंबर / सिटी सर्व्हे नंबर जे लागू असेल ते नमूद असते. त्यानंतर बिल्डिंग चे नाव नमूद असते. त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे त्या मिळकतीचा इतिहास नमूद करा लागतो. मिळकतीच्या इतिहास हा सविस्तर नमूद करावा लागतो. म्हणजे पूर्वी ती जगा कोणाची होती. कशी कशी हस्तांतर होत आली. जागा कोणी विकसित करून अपार्टमेंट बांधले, बिल्डर आणि डेव्हलपर मध्ये काय काय करार वगैरे किंवा इतर दस्त झालेले असेल तर ते नमूद करावे लागते. त्या नंतर आपण ज्या मालका कडून मिळकत घेत आहोत त्याच्या मालकी हक्का बाबत नमूद करावे लागते. त्याला मालकी हक्क कसकाय प्राप्त झाली. तो मिळकत कश्याप्रकारे विक्री करत आहे त्या बाबत नमूद करावे लागते.


त्यानंतर इंजिनिअर / आर्किटेक्ट चा बांधकाम पूर्ण झाल्याबाबतचा दाखला असू शकतो. इंजिनियर चा मंजूर नकाशा असतो. स्थानिक कार्यालय जसे अग्निशक वगैरे यांची NOC असू शकते. प्रत्येक केस नुसार काही दस्त असू शकतात किंवा नसूपण शकतात.


त्यानंतर अपार्टमेंट / फ्लॅट मिळकतीचा आपसात ठरले मोबदला आणि रक्कम कशी कशी दिली त्या बाबत नमूद करावे लागते. सर्व भरणा दिला गेला आता काही बाकी नाही हे नमूद करावे लागते.


त्यानंतर मिळकतीच्या परवानग्यांबाबाबत नमूद करावे लागते. बिनशेती परवानगी, लेआऊट मंजूर परवानगी, बांधकाम परवानगी, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला अपार्टमेंट घोषणापत्र तसेच इतर काही अन्य संबंधित दस्त. सदर अपार्टमेंट चा निर्व्हेदपणा त्याबाबत घोषणापत्र द्यावे लागते.


त्यानंतर मिळतीवर काही कर्ज वगैरे बाकी नाही. कर्ज घेतले असेल आणि फेडले गेले असेल तर त्या बाबत NOC, रिकवेयन्स बाबत दस्त जोडून त्याबाबत नमूद करावे लागते. जर भविष्यात काही कर्ज वगैरे बाकी निघाले तर त्याचे निवारण विक्री करणार त्यांच्या स्वतःचे खर्चाने करून देतील या बाबत नमूद करावे. 


मिळतीचा जुना टॅक्स, बिले वगैरे भरलेले आहे आता विक्री नंतर नवीन मालकाने ते भरे हे नमूद करावे. नवीन मालकाने त्याच्या नावे टॅक्स पावती, लाईटबिल वगैरे करून घ्यावे हे नमूद करावे. त्यानंतर अधिकार अभिलेखात ७/१२ / सिटी सर्व्हे जे लागू असेल तेथे मालक म्हणून नाव लाऊन घेणे बाबत नमूद करून घेणे बाबत करावे.

फेरफार होऊन उताऱ्यावर मालकाचे नाव कसे लागते.

एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर दस्तामध्ये कोणाचे नाव बदल असेल म्हणजे एका दस्तावर वेगळे नाव व एका दस्तावर वेगळे नाव तर अशा वेळेस नीट तपासून बघणे महत्वाचे आहे का विकणारी व्यक्ती एकच आहे ना ? त्याबाबत पुरावा घ्यावा आणि तो दस्तास लावावा. तसेच गरज पडल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र करून ते दस्तास जोडून द्यावे.


जर मिळकत जास्त जुनी असेल तर त्याबाबत संबंधित जे कार्यालय आहे जसे नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला लागू शकतो की बिल्डिंग कशी आहे. किती जुनी आहे व कसे बांधकाम आहे. हा दाखला त्या मिळकतीचे मूल्यांकन काढणेकामी लागत असतो.


त्यानंतर मिळकतीचे हस्तांतर होऊन प्रत्यक्ष ताबा दिल्याबाबत नमूद करावे. मिळकतीचे टायटल, बाबत नमूद करावे. हे सर्व ड्राफ्ट मध्ये नमूद करणे गरजेचे आहे. तसेच या व्यतिरिक्त अजून काही मिळकती संबंधात महत्वाचा मजकूर, काही परवानगी, महसूल आदेश वगैरे असतील तर ते देखील नमूद करणे महत्वाचे आहे. सदर दस्तावर लिहून घेणार व लिहून देणार यांच्या सह्या, अंगठे घेऊन घ्यावे व दस्तास त्याचे फोटो लावावे.


सदर दस्तात दोन किंवा त्यापेक्षा जास्त साक्षीदार नमूद असावेत. त्यांचे ओळखपत्र दस्तास जोडून त्यांचे सही, अंगठे दास्तात घ्यावेत. 


दस्त तयार झाला त्याला सर्व कागदपत्रे जोडली गेली की मग दस्त व सर्व कागदपत्रे तपासून सर्व बरोबर आहे ना ही खात्री करून घ्यावी. आणि मग दस्त नोंदणी कार्यालयात नोंदविनेकामी हजर करावा. मग दुय्यम निबंधक साहेब तसेच संबंधित कर्मचारी दस्त तपासातील. दस्तातील मुद्रांक शुल्क, नोंदणी फी तपासातील, मग लिहून घेणार, लिहून देणार, साक्षीदार, दस्त, मिळकत वर्णन याबाबत सर्व माहिती ऑनलाइन फीडिंग केलेली माहिती तपासली जाते. ऑनलाईन IGR प्रणालीवर उतारा, विक्री करणार मालक यांची तपासणी कार्यालयाकडून केली जाते. चलन, नोंदणी फी पावती, दस्त शुल्क पावती तपासून ऑनलाईन डिफेस केली जाते. म्हणजे ते चलन तपासले जाते व फक्त त्याच दस्तासाठी वापरले जाते. पुन्हा दुसरीकडे त्याचा उपयोग नाही होत. दस्त नोंदविणार यांचे ऑनलाईन बोटांचे ठसे व फोटो घेतले जातात. रजिस्टर मधे दस्त नोंदणी करणार यांच्या सर्वांच्या सह्या घेतल्या जातात. दस्त नोंदणी बाबत पावती दिली जाते. आणि दस्तांची नोंदणी केली जाते व काही वेळात संपूर्ण दस्त नोंदणीचे काम झाल्यावर मूळ दस्त पक्षकारास परत दिला जातो. 


एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्याच्याकडून मिळकत विकत घेत आहोत त्याच्याकडून मिळकती संदर्भात महत्वाचे कागदपत्रे घेऊन घ्यावे त्यामुळे आपल्याला भविष्यात ते कागदपत्रे लागले तर अडचण निर्माण होणार नाही. तसेच बरेच महत्वाचे कागदपत्रे तर दस्तास जोडले असतात ते तपासून घ्यावेत. जर आपण एखादी रिसेल चा जुना फ्लॅट घेत असू तर त्या जुन्या मालकाचे मूळ खरेदीखत / मालकी हक्काचा  टायटल दस्त तसेच त्या मिळकती संदर्भात जुने चेन दस्त असतील तर ते त्याच्याकडून घेऊन घ्यावे. व त्याबाबत  तुम्ही दस्तात देखील नमूद करू शकतात की, मालकाने विक्री घेणार याला कोणकोणते कागदपत्रे दिलेले आहेत आणि या मध्ये झेरॉक्स कोणते व मूळ कागदपत्रे कोणते. हा दस्त भविष्यात त्या मिळकतीवर कर्ज घेतांना किंवा ती मिळकत विक्री किंवा अन्य मार्गाने हस्तांतर करतांना कामात येऊ शकतात व तो एक मालकी हक्का बाबत पुरावा देखील असतो.


सदर दस्त हा पूर्वी मिळकत ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्याच्या कार्यालयात नोंदणी करावा लागत होता. परंतु महाराष्ट्र शासन / नोंदणी विभागाने आता एक जिल्हा एक नोंदणी सुरू केली आहे. त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होत आहे व मिळकत ज्या जिल्ह्यात आहे तेथील कोणत्याही नोंदणी कार्यालयात हा दस्त नोंदणी करता येऊ शकतो. 


कोणताही दस्त नोंदणी करण्यापूर्वी नीट काळजीपूर्वक तपासून तयार करणे व त्यास आवश्यक योग्य ते कागदपत्रे नीट लावणे महत्वाचे आहे कारण त्या दस्ता मध्ये काही चूक झाली तर आपल्याला अडचण येऊ शकते व चूक झालीच तर चूक दुरुस्तीचा दस्त देखील परत नोंदणी करावा लागू शकतो. त्यामुळे कोणताही कायदेशीर दस्त हा नीट काळजीपूर्वक तयार करावा आणि नोंदणी करणे आधी नीट काळजीपूर्वक तपासून घेणे महत्वाचे आहे.

नोंदणीकृत दस्तासोबत जोडण्याचे घोषणापत्र

              

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads