फेरफार म्हणजे काय ?
मित्रांनो आज आपण माहिती बघू फेरफार म्हणजे काय? फेरफार हा शब्द आपण कधीना ना कधी तर ऐकलाच असेल. किंवा आपणास त्याबाबत थोडीफार माहिती असेलच. फेरफार म्हणजे जमिनी / स्थावर मिळकती संदर्भात महत्वाची गोष्ट आहे. चला तर मग आपण माहिती बघू फेरफार म्हणजे काय ?
फेरफार याला इंग्रजी मध्ये Mutataion असे म्हणतात. फेरफार (Mutation) म्हणजे बदल होणे होय. स्थावर मिळकती संदर्भात अनेक बदल होत असतात. जसे मिळकत हस्तांतर झाली म्हणजे मालकी हक्कात बदल होतो किंवा अजून बरेच अनेक करणे असतील त्यामुळे स्थावर मिळकती संदर्भात बदल होत असतात.
जेव्हा स्थावर मिळकती संदर्भात एखादी कायदेशीर बदल होतो तेव्हा त्याची नोंद ही 7/१२ उताऱ्यावर घेतली जाते. आणि त्याला एक विशिष्ट नंबर देण्यात येतो आणि तो नंबर ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यात येतो यालाच फेरफार नोंद असे म्हणतात. 7/१२ उताऱ्यावर जे फेरफार नंबर नमूद असतात ती फेरफार नोंद आपण तलाठी, ऑनलाईन किंवा रेकॉर्ड रूम येथून काढली तर आपल्याला समजते की त्या फेरफार नंबर नुसार 7/१२ उताऱ्यावर काय बदल झालेला आहे. फेरफार ची तरतूद ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम यामध्ये आहे.
७/१२ उताऱ्यावर त्या स्थावर मिळकती संदर्भात जे काही बदल होत जातात त्याबाबत सर्व फेरफार आधी महसूल विभागाकडून मंजूर होतात. मग 7/१२ उताऱ्यावर तो बदल होतो आणि मग तो फेरफार नंबर नमूद केला जातो.
जेव्हा ७/१२ उताऱ्यावर अनेक प्रकारे बदल होत असतो. जसे खरेदी, विक्री, बक्षिस, वाटणी, वारस यामुळे त्या स्थावर मिळकतीच्या मालकी हक्कात बदल होत असतो. त्यावेळी संबंधित तलाठी हे त्यांचेकडे फेरफार बुक असते त्यामध्ये तो फेरफार नमूद करतात त्यासोबत जो बदल होत आहे ती माहिती नमूद करतात. त्यानंतर फेरफार मंडळ अधिकारी मंजूर करतात आणि त्याप्रमाणे ७/१२ उताऱ्यावर बदल करून ते फेरफार नंबर 7/१२ वर नमूद केला जातो.
फेरफार नोंद नंबर मंजूर न होता कोणताच बदल उताऱ्यावर केला जात नाही. त्यामुळे फेरफार नंबर मुळे एखादी संबंधित जमिनीची सर्व माहिती भेटते की उताऱ्यावर काय काय व कसे कसे बदल झालेले आहे. त्यामुळे फेरफार हे महत्वाचे असतात.
जमिनी संदर्भात कोणताही बदल असेल जसे तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी त्या जमिनी संदर्भात काही आदेश पारित केला. त्यामुळे काही बदल होत असेल तर आधी त्याची फेरफार प्रक्रिया होईल आणि मग तो फेरफार नंबर उताऱ्यावर नमूद केला जाईल. कोर्टाचा जरी एकादी स्थावर मिळकती संदर्भात आदेश असेल आणि त्याप्रमाणे काही बदल होणार असेल तर त्याची देखील फेरफार होऊन तो फेरफार नंबर उताऱ्यावर नमूद केला जातो.
महसूल अधिकारी तलाठी यांचेकडे गाव नमुना नंबर 6 ची नोंदवही असते त्याला हक्क संपादनपत्रक व फेरफार नोंदवही असे म्हणतात. यामध्ये जमिनीचे सर्व फेरफार व्यवहार, खरेदी, विक्री, वारस, खरेदी रक्कम, तारीख वगैरे सर्व माहिती नोंद केली जाते. फेरफारचा सर्व तपशील यामध्ये नोंद असतो.
या फेरफार नोंदवही मधील नोंदी संबंधित 7/12 उताऱ्यावर नोंद केल्या जातात. 7/12 उताऱ्यावर कोणताही हक्क किंवा बदल नोंदविण्यापूर्वी फेरफार नोंद केली जाते. याला गाव नमुना नंबर 6 फेरफार नोंदवही असे म्हणतात किंवा ड पत्रक नोंदी असे देखील म्हणतात किंवा काही ठिकाणी नोंदीचा उतारा असे म्हणतात. फेरफारची नोंदवही ही फेरफारची दैनंदिनी असते. रोजचे जमिनी संदर्भातील फेरफार यात नमूद केले जातात. जमिनीच्या अधिकारात जसा जसा बदल होतो त्याप्रमाणे अनुक्रमाने या नोंदी घेतल्या जातात. फेरफार घेताना चूक होऊ नये म्हणून योग्य ती काळजी व दक्षता घेणे महत्वाचे असते. फेरफार म्हणजे जमिनीच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या अशा नोंदी आहे.
गाव नमुना नंबर 6 नोंदवहीचे चार प्रकार पडतात.
(१) नमुना नंबर 6 अ विवादग्रस्त प्रकरणांची नोंद वही.
फेरफार होण्यास कोणी हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार तसेच त्यावरील चौकशी अधिकाऱ्याचा निर्णय या बाबतची माहिती या नोंदवहीत नोंदविली जाते. या बाबत माहिती या नोंदवहीत मिळते.
(२) गाव नमुना नंबर 6 ब - विलंब शुल्क नोंदवही.
(३) गाव नमुना नंबर 6 क -
ही वारस प्रकरणांची नोंदवही असते.
गाव नमुना नंबर 6 ड - पोट हिस्सा नोंदवही.
या नोंदवहीत जमिनीचे पोट हिस्से, वाटणी, भूसंपादन वगैरे यांची माहिती असते.
फेरफार कसा नोंदविला जातो.
जमिनीच्या अधिकारात तसेच 7/१२ उताऱ्यावर जसा जसा बदल होत जातो त्याप्रमाणे अनुक्रमाने या नोंदी घेतल्या जातात. जमिनीच्या नोंदी या जमीन तसेच शेतकरी यांच्या दृष्टीने खूप महत्वाच्या असतात.
फेरफार नोंदवहीत तपशील कसा लिहितात.
स्तंभ नंबर 1 : - फेरफार नोंद वही चा अनुक्रमांक लिहिला जाती. यालाच फेरफार नोंद असे म्हणतात.
स्तंभ 2 नंबर : - या स्तंभा मध्ये हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकाराचे स्वरूप लिहिले जाते. यामध्ये फेरफारचा दिनांक, सूचना मिळाल्याचा दिनांक, व्यवहाराचे स्वरूप, संबंधित खातेदारांची नवे, माहिती असते. म्हणजेच व्यवहार कधी कसा व कोणत झाला, लिहून घेणार, लिहून देणार यांची नावे ही माहिती असते. अटी व शर्ती असतील काही त्या व मोबदला रक्कम लिहिली जाते.
स्तंभ नंबर ३ : - यामध्ये जमिनीचा व्यवहार ज्या गट किंवा सर्व्हे नंबरशी संबंधित आहे तो नंबर लिहिला जातो.
स्तंभ नंबर 4 :- केलेला फेरफार हा संबंधितांना नोटीस देऊन, चौकशी करून व केलेला फेरफार बरोबर आहे ही स्वतःची खात्री करून संबंधित प्रमाण अधिकारी तलाठी महसूल अधिकारी / शक्यतो मंडळ अधिकारी फेरफार नोंदवून प्रमाणित झाल्याबाबत पदनाम लिहीन स्वाक्षरी करतात.
फेरफार नोंदी कोण करतात.
फेरफार या तलाठी अधिकारी यांचेकडून लिहिल्या जातात परंतु त्या मंजूर करण्याचा अधिकार हा मंडळ अधिकारी यांना असतो.
जर फेरफार एकदा मंजूर किंवा नामंजूर झाली तर त्या नोंदीमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार हा तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांना नसतो.
फेरफार ची प्रमाणित नोंद -
शेतजमीन किंवा इतर कोणत्याही जमिनी संदर्भात खरेदी, विक्री किंवा इतर कायदेशीर मार्गाने हस्तांतरण झाल्यावर जमीन ज्याला हस्तांतर झालेली आहे त्याची नोंद घेतली जाते सदर नोंद प्रमाणित होऊन मंजूर केली जाते त्यानुसार ७/१२ उताऱ्यावर बदल होतो, नवीन मालकाचे नाव नमूद होते. जुने नाव कमी होऊन जाते आणि ती नोंद 7/१२ उताऱ्यावर नोंदणी केली जाते. फेफर मंजूर होण्याआधी संबंधित पुरावे सादर करावे लागतात. पुरावे बघून आणि खात्री करून फेरफार नोंदविले जातात. फेरफार मंजूर झाला म्हणजे लगेच त्याची नोंद 7/१२ उताऱ्यावर येते. ७/१२ उताऱ्यावर मालकी हक्का बाबतचा उल्लेख हा त्या फेरफार नोंदीत असतो. कायद्याने नोंद चुकीची आहे हे जो पर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत ती नोंद खरीच मानली जाते. नोंद चुकीची असेल तर त्याविरूद्ध अपील करावी लागते.
जमिनीच्या अधिकाराच्या होणाऱ्या बदलाच्या क्रमवारी या नोंदी घेतल्या जातात. 7/१२ वर झालेला बदल हा कसा झाला याबाबत माहिती ही त्या संबंधित नोंदी मध्ये असते. जमिनी बाबत पूर्वीची संपूर्ण माहिती आपल्याला या फेरफार वाचून समजू शकते.
फेरफार नोंदविताना प्रथम कच्ची फेरफार नोंदविली जाते. त्यानंतर महसूल विभागाकडून गावचावडी वर त्याबाबत नोटीस लावली जाते. सदर नोटीस आता आपली चावडी या महसूल खात्याच्या वेबसाईटला ऑनलाईन लावली जाते. 15 दिवसांच्या मुदतीत बघितले जाते की कोणाची काही हरकत येते का आणि कोणाला काही हरकत असेल तर मंडळ अधिकारी यांचेकडे हरकत दाखल करावी लागते. जर हरकत प्राप्त झाली तर मंडळ अधिकारी समोरील पक्षाला नोटीस पाठवतात. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकले जाते. पुरावे तपासले जातात आणि योग्य तो निर्णय मंडळ अधिकारी देतात आणि फेरफार मंजूर किंवा नामंजूर देखील होऊ शकते.
फेरफार मंजूर किंवा नामंजूर झाली तर त्याबाबत प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करावी लागते.


