भागीदारीपत्रातील मधील काही महत्वाचे मुद्दे.

Adv.Saurabh Rajput
0


भागीदारीपत्रातील मधील काही महत्वाचे मुद्दे. 


मित्रांनो आपण माहिती बघू भागीदारीपत्र म्हणजे काय व भागीदारीपत्रात काय काय महत्वाच्या गोष्टी नमूद असतात. यामुळे आपल्याला भागीदारी विषयी माहिती मिळेल. तसेच आपणास देखील भागीदारीने एखादी व्यवसाय करणे असेल तर त्याचा आपणास फायदा होऊ शकतो. 


दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोक एकत्र येऊन व्यवसाय सुरू करतात आणि नफा तोटा वाटून घेतात तर त्यासाठी लिखित भागीदारी (पार्टनरशिप) चा दस्त तयार करावा लागतो. भागीदारी (पार्टनरशिप) दस्त हा भविष्यात भागीदारांमध्ये वाद होऊ नये म्हणून केलेले कधीही चांगले राहते. नोंदणीकृत भागीदारी पत्रामुळे आपली भागीदारी कायदेशीर होते. काही वाद निर्माण झाला तर कोर्टाकडून वाद सोडवता येतो. भागीदारीला कायद्याचे संरक्षण प्राप्त होते. 


चांगली व यशस्वी भागीदारी करण्यासाठी सर्व भागीदारांमध्ये एकमत, समन्वय, विश्वास असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे कायदेशीर नोंदणीकृत भागीदारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व लिखित व नोंदणीकृत असल्याने त्याचा फायदा भागीदारी संस्था व भागीदारांना होईल.


 आपल्या देशात भागीदारीच्या नियमनासाठी भारतीय भागीदारी कायदा, १९३२ (The Indian Partnership Act, 1932) लागू असून या कायद्या नुसार भागीदारी होते तसेच भागीदारी चे नियमन होऊन भागीदारांचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, भागीदारीची स्थापना होत असते. भागीदारीसाठी असणाऱ्या सर्व गोष्टी या कायद्या मधे नमूद आहे.


भागीदारीपत्रातील महत्वाचे मुद्दे. 


आपण माहिती बघू भागीदारीपत्रात काय काय महत्वाचे मुद्दे असतात. सदर माहिती ही फक्त आपणास माहिती व्हावी म्हणून दिलेली असून यामध्ये भागीदारी मधील काही सामान्य मुद्दे सांगितलेले आहेत. परंतु आपल्याला भागीदारीपत्र तयार करणे असेल तर जानकर  वकिलांकडून किंवा CA कडून दस्त तयार करून त्याची नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक भागीदारी ही वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे भागीदारीचे स्वरूप, तिचा प्रकार नंतर भागीदारांमध्ये आपसात काय ठरते यावरून त्याप्रमाणे दस्त तयार करावा लागत असतो. प्रत्येक भागीदारी दस्तात त्याच्या प्रकारानुसार काही मुद्दे वेगवेळे राहू शकतात. पुढे दिलेले मुद्दे हे काही ठराविक कॉमन मुद्दे आहेत जे प्रत्येक भागीदारी दस्तात येत असतात.


भागीदारीपत्र  :-   (Partnership Deed)

भागीदारीपत्र तयार करतांना दस्तात सर्वात सुरवातील भागीदारीपत्र नाव हेडिंग राहते. त्यानंतर तारीख, वार, दस्त कुठे केला जातो आहे हे नमूद असते.


भागीदारीपत्र लिहून ठेवणार :-  

(Name Of Partners)

 जे काही सर्व भागीदार आहेत त्यांचे नावे, त्यांचे वय, ते काय काम करतात त्याचा धंदा, त्यांचा संपूर्ण पत्ता नमूद असतो. त्यानंतर त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर दस्तात नमूद करावे.


भागीदारी फर्म चे नाव :-

(Name of Business / Partnership Firm)

त्यानंतर भागीदारी दस्ततात भागीदारी फार्म चे नाव नमूद असते. तसेच भागीदारीचे नाव बदलण्याचा अधिकार सर्व भागीदारांना राहील वगैरे नमूद असते. 


भागीदारी फर्म चा पत्ता :-

(Place Of Business / Address of Partnership Firm)

त्यानंतर भागीदारी फर्म चे मुख्य ठिकाण, कार्यालय, त्याचा संपूर्ण पत्ता नमूद असतो. तसेच भागीदारी व्यवसायासाठी जागा भाड्याने घेतलेली असेल तर त्याबाबत नमूद असते. तसेच सर्व भागीदारांनी ठरविल्यास भागीदारी व्यवसाय इतरत्र करता येईल या बाबत नमूद असते.


भागीदारी व्यवसायाची सुरुवात - 

(Commencement of Business)

भागीदारीपत्रात नमूद असते की भागीदारीची सुरुवात कधीपासून होणार आहे. भागीदारी कधीपासून चालू होईल ती दिनांक नमूद असते.


भागीदारीचा प्रकार :-

( Type of Partnership)

भागीदारी दस्तात भागीदारीचा प्रकार नमूद असते. त्यानंतर नमूद असते भागीदारीतील कोणते भागीदार कामे बघतील. वर्किंग भागीदार (Woking Partners) कोण. असतील. कोणते भागीदार स्लीपिंग भागीदार (Sleeping Partners) राहतील व भागीदारीच्या आवश्यकतेनुसार कोण कसे काम बघेल हे नमूद असते.


भांडवल :-

(Capital of the Partnership)

भागीदारीच्या सुरवातील सर्व भागीदार किती भांडवल जमा करत आहेत. त्यानंतर भागीदारी मधे वेळी वेळी गरजे प्रमाणे एकत्रपणे ठरवून भांडवल टाकावे. जर सर्व भागीदारांचे भांडवल सम प्रमाणात नसेल तर ज्याचे भांडवल जास्त आहे त्याला कसा मोबदला भेटल. त्यावरील व्याज वगैरे या बाबत नमूद असते. तरी सदर व्याजाचा दर हा आकार व इतर लागू प्रचलित कायद्यानुसार जास्त नसावा लागतो.


भांडवलाचे व्याज :- 

(Interest on Capital)

याबाबत ठरल्यानुसार भांडवलाच्या व्याजाबाबत नमूद असते. हे सर्व भागीदारी कायदा, इन्कम टॅक्स कायदा, तसेच संबंधित लागू कायद्यांच्या तरतुदीनुसार नमूद करावे लागते.


भागीदारांचे पगार (मानधन) -

(Sharing Profit and Loss Account

भागीदारांना पगार हा आयकर कायद्यातील संबंधित तरतुदीनुसार देण्यात येतो. 


भागीदारी व्यवसायाचे स्वरूप - 

(Objects of Business)

हा मुद्द देखील महत्वाचा असून या मध्ये भागीदारी व्यवसाया बाबत नमूद करावे लागते. कोणत्या व्यवसायासाठी भागीदारी राहील. कायकाय काम केले जाईल. त्या कामाचे स्वरूप काय. भागीदारी मध्ये काय व्यवसाय केला जाईल. वाटले तर सर्वानुमते कुठे कुठे व्यवसायाच्या शाखा उघडल्या जातील. याबाबत नमूद असते. 


नफा तोटा वाटणी :-

(Profit and Losss Sharing)

भागीदारी व्यवसायाच्या मिळणाऱ्या नफ्या मधून भांडवल सम प्रमाणात वजा झाल्यावर काही इतर खर्च असेल ते किंवा अतिरिक्त झालेला खर्च वजा जात जो निव्वळ नफा आणि तोटा येईल तो कसा सम प्रमाणात वाटप होईल या बाबत नमूद असते. भागीदारीत जशी भांडवलाची टक्केवारी आहे त्यानुसार नफा तोटा  नमूद असू शकतो. 


बँक खाते :-

(Banking Account)

भागीदारीचे बँक खते भागीदारी फर्म च्या नावाने बँकेत चालू करणे. तसेच गरजे नुसार एक किंवा जास्त खाते सुरू करता येईल. तसेच भागीदारीचा बँक व्यवहार कोणा कोणा भागीदाराच्या सहीने चालेल. हे नमूद करावे लागते. हे सर्व आपसात भागीदारांमध्ये काय ठरते त्यानुसार नमूद करावे लागत असते.


कर्ज :-

भागीदारी फर्मला गरज वाटल्यास बँक अथवा मान्यताप्राप्त वित्तीसंस्थेकडू  कर्ज घेणे असेल तर सर्व भागीदारांची लेखी संमती वगैरे या बाबत नमूद करावे लागते. आपसात काय ठरते त्यानुसार नमूद करावे लागते.


अकौंट :-

भागीदारी संस्था ही आपले वेळच्या वेळी करावयाचे हिशोब हे मान्य दिनांक पद्धतीनुसार प्रत्येक वर्षी ठेवतील. उदा. हिशोब पुस्तके, बिले, व्हाउचर्स, जमा व खर्चाच्या रक्कमा, तसेच मालमत्ता व जबाबदाऱ्या, नफा, तोटा, ताळेबंद इत्यादी संबंधित कागदपत्रे हे फर्मच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात येतील. त्यासाठी योग्य त्या हिशोबनीस ची नेमणूक करता येईल. फर्मचे पहिले हिशोबाचे वर्ष ज्या दिवशी भागीदारी सुरू होत आहे ती तारीख व 31 मार्च पर्यंत. वत्यानंतर मात्र 01 एप्रिल ते 31 मार्च असे राहते. करत आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ला चालू होऊन 31 मार्च ला संपत असते. सर्व भागीदारांना कार्यालयीन वेळेत हिशोबाच्या वह्या पाहणे, तपासणे त्याच्या नकला करणे याचा अधिकार आहे. याबाबत नमूद असते.


भागीदारी व्यवसायाचा कार्यकाळ :-

(Dissoluation)

 सदरची भागीदारी ही ऐच्छिक स्वरुपाची असुन ती आपण पाहली भागीदारांच्या मर्जीप्रमाणे म्हणजेच (At Will) अशी राहील तथापि, लोकांचे येणे व भागीदारीचा हिशोब पूर्ण झाल्यावर भागीदारीतून एखादा भागीदार निवृत्त होऊ शकेल. निवृत्त होणाऱ्या भागीदाराने आपल्या निवृत्तीची एक महिना पूर्व लेखी सूचना इतर भागीदारांना देणे बंधनकारक राहील.

 हे सर्व आपसात काय ठरते ते नमूद करावे लागते.


प्रत्येक भागीदार :-

(Duties and Responsibilities)

 अ)  प्रत्येक भागीदार भागीदारीच्या सर्व व्यवहारात अन्य भागीदाराशी प्रामाणीक व विश्वसनीय राहील. तसेच इतर भागीदारास फर्मच्या घटनांचे आवश्यक ती सर्व माहिती वेळोवेळी देईल.


  ब) भागीदारी फर्मच्या हिताते सर्व आवश्यक ते प्रयत्न प्रत्येक भागीदाराने काळजी पूर्वक करावयाचे आहे.


  क) प्रत्येक भागीदार सर्व वेळी अन्य भागीदारास योग्य व प्रामाणिकपणे फर्मचे जमा खर्च देईल. जमा खर्चात कुठलीही बाब लपवून ठेवणार नाही, असे घडल्यास त्याचे योग्य ते स्पष्टीकरण त्वरित करावयाचे आहे.


   ड) फर्मच्या नावाने मिळालेली चेक, हुंड्या, पैसे हे फर्मच्या खात्यात जमा करेल.


   इ) भागीदारी फर्म जो व्यसाय करत आहे त्यामध्ये कसूर होणार नाही. संबंधित व्यसनाचे नियम कायदे पाळून भागीदारी व्यवसाय केला जाईल या बाबत नमूद करावे.


नवीन भागीदार प्रवेश / निवृत्ती / मृत्यू :-

(Death, Retirement and Insolvency)

सर्व भागीदारांच्या संमतीने नवीन भागीदारास भागीदार म्हणून या फर्म मध्ये समाविष्ट करता येईल. तसेच भागीदारास निवृत्त व्हायचे झाल्यास त्यास वर म्हटल्याप्रमाणे एक महिना पूर्व लेखी सूचना अन्य भागीदारास द्यावी लागेल. भागीदाराच्या निवृत्ती किंवा मृत्यु मुळे भागीदारी संपुष्टात येणार नाही. उर्वरित भागीदारांच्या संमतीने भागीदारी फर्म पुढे चालू ठेवता येईल. 


एखाद्या भागीदाराच्या मृत्युनंतर भागीदारी फर्म वरील तारखेपर्यंत फर्मचे अकौंट उदा. नफा तोटा खाते, ताळेबंद तीन महिन्यांच्या आत तयार करतील व वरील नयत भागीदारांच्या वाट्याचे / हिश्याची रक्कम त्याच्या वारसास देण्यात येईल.


प्रत्येक भागीदार इतर भागीदारांच्या लेखी संमती शिवाय :-

  अ) फर्मला कुठलीही देणे असलेली रक्कम, दावे, हक्क रद्द करणार नाही.

   ब) या व्यवसायाचा संबंधी इतर व्यक्ती, संस्था, यांच्याशी व्यवहारिक करार करणार नाही.

   क) फर्मची कुठलीही मालमत्ता तारण ठेवणार नाही अथवा विकणार नाही.

   ड)  फर्मच्या वतीने त्रयस्थ व्यक्ती, संस्था किंवा स्वतःला जामिन राहणार नाही.


भागीदारी निर्णय :- 

या भागीदारी पत्रात तरतूद न केलेल्या इतर सर्व बाबीसंबंधी निर्णय भागीदारांच्या बहुमताने घ्यावयाचा आहे.


एखाद्या भागीदाराने फर्मच्या हिताविरुद्ध वर्तन केल्यास त्यांना भागीदारी फर्म मधून काढण्याचा अधिकार उरलेल्या भागीदारांना राहील. व दोषी भागीदाराने फर्मला झालेल्या नुकसानीची रक्कम फर्ममध्ये जमा करावयाची तेव्हाच त्यांच्या वाट्याची रक्कम देण्यात येईल.


 वाद :- 

भागीदारी कालावधीतील अथवा भागीदारी विसर्जनानंतर वाद अथवा मतभेद निर्माण झाल्यास त्याचे निराकरण सर्वांच्या संमतीने दोन प्रतिष्ठीत, जाणकार लवाद नेमून वाद सोडविण्यात येईल. सदरचा वाद लवादाच्या मार्फत न सुटल्यास त्याचा निर्णय प्रचलित कायद्यानुसार घेण्यात येईल व कायद्यानुसार आलेला निर्णय सर्व भागीदारांना बंधनकारक राहील.


बदल:-

 या पत्राच्या व इतरत्र काहीही नमूद केलेले असले तरी पाहवी भागीदार बहुमताने व लेखी संमतीने व्यवसायाच्या उत्कर्षासाठी तसेच भल्यासाठी वरील नमूद केलेले बाब क्रमांक 1 ते 19 मध्ये कोणतेही बदल करू शकतील व ते त्यांनी लिहीलेत स्पष्टत उतरवून घेणे आवश्यक राहील व तो बदल / दुरुस्ती या भागीदारीपत्राचा भाग समजण्यात येईल. सदर भागीदारीस भागीदारी कायदा लागू राहील.


भागीदारी पत्राच्या शेवटी तारीख, वार व ठिकाण नमूद असते तसेच भागीदारीपत्र लिहून ठेवणार सर्वांचे नावे व सही असते तसेच साक्षीदारांचे नाव पत्ता व सह्या असतात.


कायद्यानुसार भागीदारी करणेकामी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 भागीदार असावे लागतात. 50 पेक्षा जास्त भागीदार असतील तर कायद्यानुसार नोंदणीकृत कंपनी स्थापन करावी लागत असते.


ही सर्व माहिती भागीदारी मधे काय काय नमूद असते त्या बाबत आहे. परंतु  भागीदारी दस्त तयार करताना भागीदारी कसली आहे. तिचे स्वरूप, आपसात काय ठरते, कार्यकाळ यावरून तयार करावी लागेल. त्यामुळे यासाठी जानकर वकिलाचा सल्ला घेऊन त्यांच्याकडून भागीदारी दस्त तयार करून तो नोंदणीकृत मारून घ्यावा. म्हणजे तुमची भागीदारी ही कायदेशीर होऊन त्याला कायद्याने संरक्षण प्राप्त होईल. 


प्रत्येक कायदेशीर दस्त त्याचे स्वरूप कायद्यानुसार वेगवेगळे असते त्यामुळे कोणताही दस्त कॉपी पेस्ट करू नये नाहीतर त्यामुळे चुकीचा दस्त होऊ शकतो व अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणतेही काम ज्या त्या क्षेत्रातील कायदेशीर मान्यताप्राप्त अनुभवी व्यक्तीकडून करून घेणे महत्वाचे आहे. 

  • थोडे नवीन

    भागीदारीपत्रातील मधील काही महत्वाचे मुद्दे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads