सातबारा उताऱ्यावर एक किंवा अनेक भावांची / मालकांची सामाईक मालकी हक्काने नावे नमूद असतील तर एक भाऊ संपूर्ण जमीन विक्री करू शकतो का ?
जेव्हा एखादी जमीन दोन किंवा अनेक भाऊ / मालकांची सामायिक मालकी हक्काची मिळकत असते. म्हणजे ती मिळकत त्यांच्या एकत्रित मालकी हक्काची मिळकत होय.
संपत्ती हस्तांतरण कायद्यानुसार एक व्यक्ती संपूर्ण मिळकत विक्री किंवा हस्तांतर करू शकत नाही. तो केवळ स्वतःचे हिश्याची विक्री करू शकतो परंतु त्यासाठी प्रथम कायदेशीर वाटणी करून घेऊन त्याचा हिस्सा वेगळा करून घेणे कायदेशीर दृष्ट्या महत्त्वाचे आहे.
वाटणी न करता एक मालक त्याचा हिस्सा विकताना अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होतात. जसे संपूर्ण क्षेत्रामधील विक्री करणार याचा हिस्सा कोणता ? त्याचे क्षेत्र किती ? त्याची दिशा कोणती ? त्याला जाण्या येण्यासाठी रस्ता कुठून ? तसेच इतर सहमालकांनी त्या व्यवहारास हरकत घेतली तरी देखील त्या व्यवहारास कायदेशीर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे एका मालकाला त्याचा हिस्सा कायदेशीर विक्री करण्यासाठी प्रथम वाटणी करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी खातेफोड करून घेऊन वाटणी करून घेऊन, सातबारा उताऱ्यावर वाटणी प्रमाणे क्षेत्र स्वतंत्र करून घेणे महत्त्वाचे आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच अशा संदर्भातील केसेस मध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्णयांमध्ये देखील आपल्याला दिसून येईल की, जोपर्यंत औपचारिक वाटणी होत नाही, तोपर्यंत कोणताही सह-मालक संपूर्ण जमिनीचा ताबा किंवा मालकी दुसऱ्या खरेदीदाराला देऊ शकत नाही.
जर एका भावाने परस्पर संपूर्ण जमीन विकली तर काय होईल?
बेकायदेशीर ठरेल : जर एका भावाने दुसऱ्या भावाच्या संमतीशिवाय संपूर्ण जमीन विकली, तर तो व्यवहार बेकायदेशीर किंवा विधीनुसार रद्दबातल ठरू शकतो.
दुसरा भाऊ / इतर सह मालक यांना या विक्रीविरुद्ध दिवाणी न्यायालयात दाद मागू शकतो आणि स्टे ऑर्डर किंवा विक्री पत्र रद्द करण्यासाठी दावा दाखल करू शकतो. त्याला आक्षेप घेण्याचा अधिकार आहे.
खरेदीदाराचे अधिकार : खरेदीदाराला केवळ विकणाऱ्या भावाच्या हिश्शाएवढाच (उदा. अर्धा हिस्सा) अधिकार मिळू शकतो, संपूर्ण जमिनीवर नाही.
एक सहमालक = स्वतःचा हिस्सा विकू शकतो; परंतु इतर सहमालकांच्या संमतीशिवाय संपूर्ण संयुक्त जमीन विकण्याचा अधिकार सामान्यतः नसतो.
स्वतःचा हिस्सा विकण्यापूर्वी वाटणी करून घेणे किंवा इतर सहमालकांची संमती घ्यावी.
Transfer of Property Act, 1882 च्या कलम 44 नुसार, सहमालकाला त्याचा स्वतःचा अविभाजित हिस्सा (undivided share) हस्तांतरित करता येतो; त्यामुळे इतर सहमालकांचे हक्क आपोआप संपत नाहीत.
आधी कायदेशीर वाटणी करून घेणे किंवा इतर सह मालकांची संमती घेऊन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे इतर कायदेशीर अडचणी भविष्यात निर्माण होणार नाहीत व झालेला व्यवहार कायदेशीर होईल.
संपूर्ण जमीन वैधपणे विकायची असल्यास, साधारणपणे सर्व सहमालकांनी विक्रीखतावर विक्रेते म्हणून सहभागी होणे आवश्यक असते किंवा संबंधित सहमालकाने वैध नोंदणीकृत Power of Attorney/अधिकृत अधिकार दिलेला असणे आवश्यक असते.

