खरेदीखत केल्यानंतर 7/१२ उतारा किंवा सिटी सर्व्हे मलमत्तपत्रक उतारा यावर मालकाच्या नावाची नोंद करण्याची प्रक्रिया.
कोणतीही स्थावर मिळकत खरेदी केल्यानंतर किंवा तिच्या मालकी हक्कात कायदेशीर बदल झाल्यावर जुने नाव कमी होऊन नवीन मालकाचे नाव उताऱ्यावर लागत असते. हे सर्व कामकाज महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार होत असते.
जमिनीच्या किंवा जागेच्या (7/12) सातबारा उताऱ्यावर किंवा सिटी सर्व्हे उतारा जे लागू असेल त्याला मालक म्हणून नोंद करण्यासाठी फेरफार (Mutation) प्रक्रिया पूर्ण करणे महत्वाचे असते.
स्थावर मिळकत कोणत्याही अन्य कायदेशीर मार्गाने जरी हस्तांतर झालेली असेल जसे बक्षिसपत्र, वाटणीपत्र, मृत्युपत्र, किंवा वारस हक्काने वगैरे तरी त्यासाठी ही फेरफार प्रक्रिया महत्वाची असते आणि फेरफार प्रक्रिया होऊन नवीन मालकाच्या नावाची नोंद उताऱ्यावर होत असते.
सब-रजिस्ट्रार (दुय्यम निबंधक नोंदणी) कार्यालयात खरेदीखत किंवा जो काही मालकी हक्काचा दस्त असेल तो दस्त नोंदणी झाल्यानंतर ही फेरफार प्रक्रिया पूर्ण करून उताऱ्यावर नाव लावणे कामी विहित नमुन्यातील फेरफार अर्ज भरून खरेदीखताच्या प्रतीसह व नोंदणीकृत दस्ता चे सूची 2 चे प्रती सह कागदपत्रे संबंधित गावाच्या तलाठी कार्यालयात किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागतात. मिळकत जर सिटी सर्व्हे हद्दीत असेल व सि.स उतारा लागू असेल तर सदर अर्ज हा सिटी सर्व्हे कार्यालयात जमा करावा. अर्ज जमा केल्याबाबत पोहोच तुम्हास भेटून जाईल.
फेरफार प्रक्रिया आता ऑनलाईन झालेली असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. सदर फेरफार अर्ज 'आपली चावडी' / 'ई-फेरफार' प्रणालीद्वारे केला जाते. ऑनलाईन प्रक्रियेमुळे मानवीय हस्तक्षेप कमी झालेला आहे. त्यामुळे कागदपत्रे घेऊन तलाठ्याकडे जास्त फेऱ्या मारण्याची गरज नाही. ई-फेरफार प्रणालीमुळे काम सोप्पे व जलद झालेले आहे. खरेदीखत होताच तलाठ्याकडे नोंदणी झालेल्या दस्तांची माहिती ऑनलाइन दिसते / पोहोचते. तसेच फेरफार ची स्थिती आपल्याला ऑनलाईन तपासता येते.
अर्जासोबत पुढील कागदपत्रे देणे गरजेचे आहे. जसे नोंदणीकृत खरेदीखताची प्रत तसेच दस्तची सूची 2 म्हणजेच इंडेक्स (Index II) ची प्रत. नवीन चालू काढलेला डिजिटल किंवा सही शिक्क्याचा सातबारा उतारा. खरेदीदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड. शेतजमीन खरेदी केलेली असल्यास शेतकरी असल्याचा पुरावा किंवा शेतकरी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत सदर करावी.
सदर अर्ज संबंधित तलाठी कार्यालयात प्राप्त झाल्यावर प्रथम कच्ची फेरफार नोंदविली जाते. तदनंतर तलाठी गावाच्या चावडीवर / ऑनलाइन प्रणालीवर १५ दिवसांची नोटीस बजावतात, ज्यामध्ये कोणाला हरकत (Objection) नोंदवायची आहे का, हे पाहिले जाते.
15 दिवसांची नोटीस ही यासाठी दिली जाते की कोणाची फसवणूक होऊन व्यवहार झाला असेल तर त्याला त्याची माहिती मिळावी. आणि त्यावर हरकत घेऊन तो फेरफार रद्द करता यावा.
१५ दिवसांच्या मुदतीत कोणतीही हरकत न आल्यास, मंडळ अधिकारी यांच्याकडून फेरफार मंजूर केला जातो. त्यानंतर फेरफार मंजूर झाल्यानंतर तलाठी सातबाऱ्याच्या 'अधिकार' हक्कात (Rights कॉलम मध्ये) रकान्यात नवीन खरेदीदाराचे नाव नोंदवतात. सामान्यतः कोणतीही हरकत न आल्यास जास्तीत जास्त 21 ते ३० दिवसांच्या आत सातबाऱ्यावर नवीन मालकाचे नाव लागते.
डिजिटल गावचावडी संकेतस्थळा विषयी माहिती
७/१२ किंवा सिटी सर्व्हे उताऱ्यावर बँकेचा बोजा चढवणे किंवा कमी करणे कमी देखिल तलाठी किंवा संबंधित सिटी सर्व्हे कार्यालयात अर्ज सादर करून सदर फेरफार प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागत असते.








