स्थावर मिळकतीचे चेन दस्त म्हणजे काय ? आणि स्थावर मिळकतीचे चेन दस्ताचे महत्त्व.
आपण माहिती बघू स्थावर मिळकतीचे जुने चेन दस्त म्हणजे काय ? आणि चेन दस्त का महत्वाचे असतात.
स्थावर मिळकत जुन्या पूर्वीच्या मालकाकडून जशी जशी हस्तांतर होत आलेली असते, त्या बाबत जे काही जुने हस्तांतरणाचे दस्त असतात त्यांना चेन दस्त असे म्हणतात. थोडक्यात स्थावर मिळकत हस्तांतर झाल्याबाबतचे जुने दस्त म्हणजे चेन दस्त होय. चेन दस्ताला इंग्रजी मध्ये मदर दीड असे म्हणतात.
चेन दस्ता मध्ये जूने खरेदीखत, बक्षिसपत्र, वाटणीपत्र, मृत्यूपत्र, हक्कासोडपत्र या पैकी कोणतेही दस्त असू शकतात. ज्या ज्या दस्ताने मिळकत हस्तांतर होत आलेली असते ते ते दस्त त्या त्या मिळकतीचे चेन दस्त असतात.
स्थावर मिळकत ही अनेक कायदेशीर मार्गानं हस्तांतर होत असते. जसे खरेदीखत, बक्षिसपत्र, वाटणीपत्र, मृत्युपत्र वगैरे. मिळकत जेव्हा जेव्हा हस्तांतर होत जाते तेव्हा तेव्हा त्या मिळकतीचा हस्तांतरणाचा कायदेशीर दस्त तयार होत जातो. त्यासंदर्भात जे आधीचे जुने दस्त असतात त्यांना चेन दस्त असे म्हणतात. चेन दस्त म्हणजे हे आधीच्या मालकाचे मालकी हक्काचे दस्त असतात. त्यामुळे मिळकत ही आधीच्या मालकाकडून आताच्या मालकापर्यंत कश्याप्रकारे हस्तांतर होत आलेली आहे हे समजण्यास चेन दस्तामुळे मदत होत असते.
स्थावर मिळकतीच्या कागदपत्रांमध्ये चेन दस्त हे कायदेशीर दृष्ट्या खूप महत्वाचे दस्त असतात. चेन दस्तांमुळे समजण्यास मदत होते की, मिळकत कायदेशीरपणे हस्तांतर होत आलेली आहे का ? चेन दस्तामुळे स्थावर मिळकतीचे टायटल व इतिहास समजण्यास मदत होते. चेन दस्ता सोबत जे काही इतर संबंधित दस्त जोडलेले असतात जसे एन.ए. ऑर्डर, बांधकाम परवानगी,जुने उतारे वगैरे अनेक संबंधित दस्त जोडलेले असतात त्यामुळे देखील त्या मिळकतीचा कायदेशीर सर्च घेण्यास मदत होत असते व त्यासाठी हे जुने चेन दस्त देखील महत्वाचे असतात. मिळतीचा जेव्हा सर्च घेतला जात असतो तेव्हा देखील त्या मिळकतीचा हस्तांतरणाची साखळी (चेन) तपासली जात असते.
जेव्हा आपण स्थावर मिळकत विकत घेतो तसेच नवीन मालकाकडे मिळकत हस्तांतर होते तेव्हा आधीच्या मालकाकडून त्याच्या मालकी हक्काचा चालूचा मूळ दस्त आणि आधीचे जुने चेन दस्त घेणे महत्वाचे आहे. कारण चेन दस्तामुळे समजण्यास मदत होते की, आताच्या मालकाकडे मिळकत कशी आलेली आहे. तो त्या मिळकतीचा कायदेशीर मालक तर आहे ना ? त्याला ती मिळकत विक्री करण्याचा अधिकार आहे का ? पूर्वी मिळकत कोणाच्या मालकीची होती. त्याला ती मिळकत कशी मिळाली आहे. जो व्यक्ती मिळकत विक्री / हस्तांतर करत आहे त्याच्याकडे कायदेशीर मार्गाने मिळकत हस्तांतर होऊन तर आलेली होती ना ? दस्त विक्री करणेचा त्याला कायदेशीर अधिकार तर आहे ना ? मिळकतीचा तो एकमेव मालक आहे का अजून अनेक मालक होते किंवा आहेत हे समजण्यास मदत होत असते.
काही वेळेस असे होते की, जो व्यक्ती मिळकत विक्री करत आहे, समजा प्लॉट मिळकत विक्री करत आहे तर तो काय करतो की त्याच्या मालकीचा संपूर्ण प्लॉट असेल आणि तो त्यापैकी अर्धाच भाग विक्री करतों. त्यामुळे अर्धा प्लॉट त्याच्याकडे शिल्लक राहतो व अर्धा प्लॉट तो विक्री करतो. जुना चेन दस्त हा पूर्ण प्लॉट मिळकतीचा असतो व तो अर्ध्या उर्वरित प्लॉट चा मालक असल्याने नवीन मालकास आधीचा मूळ दस्त देत नाही. चेन दस्त त्याच्या स्वतः जवळ ठेवतो. अशा वेळेस त्या जुन्या चेन दस्तांची झेरॉक्स कॉपी आधीच्या मालकाकडून घेऊन घ्यावी आणि त्या दस्तांची प्रमाणित प्रत नोंदणी कार्यालयातून काढून घ्यावी.
आपल्याकडून मिळकतीचा जुना चेन दस्त हरवला असेल तर त्याबाबत शोध घेऊन तो दस्त सापडला तर त्याला नीट जपून ठेवणे महत्व आहे. आणि दस्त शोधून देखील मिळून आला नाही तर त्या बाबत कायद्या नुसार लॉस्ट प्रोसेस करणे महत्वाचे आहे. त्यासाठी पोलिसात वस्तू / मूळ दस्त हरविल्याबाबत तक्रार दाखल करून द्यावी. तक्रार दाखल करताना नीट व पूर्ण माहिती द्यावी जसे हरवलेल्या दस्ताचा नंबर, दस्त कधी व कुठे हरवला त्याचे ठिकाण, दस्त हरवल्याची वेळ आणि तारीख तसेच दस्तांची झेरॉक्स प्रत अर्जासोबत सोबत जोडून द्यावी. म्हणजे दस्त शोधण्यास पोलिसांना मदत होऊ शकते. तसेच दस्त हरविल्याबाबत तक्रार ऑनलाईन देखील दाखल करता येते. त्यानंतर मूळ दस्त हरवल्याबाबत वृत्तपत्रात जाहिर नोटीस देऊन द्यावी. नोटीस स्थानिक मराठी वृत्तपत्रात आणि एक इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित करावी. जाहीर नोटीस दिल्यामुळे जर कोणाला मूळ दस्त सापडला तर तो आपल्या परत मिळण्यास मदत होऊ शकते. आणि जर कोणी त्या मूळ दस्ताचा गैरवापर केला तर आपण पोलिस तक्रार दिलेली असल्यामुळे आणि जाहीर पेपर नोटीस प्रकाशित केलेली असल्यामुळे आपल्याकडे एक पुरावा तयार होईल आणि त्या हरविलेल्या चेन दस्ता बाबत काही अडचण आल्यास तो पुरावा आपल्याला कामात येऊ शकतो.
इतर ब्लॉग पोस्ट
हरविलेल्या वस्तू किंवा कागदपत्रांची लॉस्ट प्रोसेस कशी करावी.
बँक जेव्हा एखादी स्थावर मिळकतीवर कर्ज देते तेव्हा बऱ्याच वेळा बँक मूळ चेन दस्तांची मागणी करतात. कारण बँकेला त्या मिळकतीचे टायटल क्लिअर पाहिजेल असते. आणि असे देखील होऊ शकते की आधीचे जुन्या दस्तावर लोन घेतलेले असू शकते आणि तो चेन दस्त दुसऱ्या बँकेकडे जमा असू शकतो व दुसरे लोन चालू राहू शकते. किंवा आधीच्या मालकाचे लोन जर चालू असेल तर त्यामुळे बँकेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे बँक ग्राहकाकडे कर्ज देताना चालू दस्ता सोबतच मूळ चेन दस्तांची मागणी करते. आणि जर जुने चेन दस्त मिळून आले नाही तर बँकेच्या सांगण्याप्रमाणे हरविलेल्या दस्ताची लॉस्ट प्रोसेस करावी लागू शकते.
आपण वर बघितलेल्या माहिती प्रमाणे स्थावर मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये चेन दस्त खूप महत्वाचे आहेत व ते सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे मिळकतीचा इतिहास समजण्यास मदत होते व मिळकतीचे टायटल क्लिअर आहे की नाही हे समजण्यास मदत होऊ शकते.
आपले मालमत्तेचे सर्व मूळ दस्त स्कॅन करून आपल्या मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मेल, ड्राइव्ह का सेव्ह करून ठेवावे. कारण जेव्हा केव्हा आपल्याला दस्त लागेल तेव्हा आपण तो तपासू शकतो / चेक करू शकतो. त्याची प्रिंट काढू शकतो व काही काम असेल तर ते दस्त सोबत घेऊन जाण्याची गरज नाही. त्यामुळे मूळ दस्त हरवणार नाही व खराब होणार नाही. जुने चेन दस्त हे अत्यंत महत्वाचे असल्याने मूळ दस्त सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.


