बक्षिसपत्र करावे की मृत्युपत्र करावे.
मुले जर चांगले असतील सांभाळ करणारे,काळजी घेणारे असतील तर त्यांच्या नावे आई वडील हयात असतानाच मिळकत हस्तांतर करणे काही वाईट नाही. परंतु आज समाजात ज्या गोष्टी घडतांना दिसत आहेत जसे की मुले आई वडिलांचा वृध्दापकाळात सांभाळ करत नाहीत त्यांना त्रास देतात. त्यामुळे आता आई वडिलांना देखील मिळकत मुलांच्या नावे हस्तांतर करण्यापूर्वी विचार करून व विचारपूर्वक निर्णय घेणे महत्वाचे झालेले आहे.
मुलांनी देखील लक्षात ठेवले पाहिजेल की आपल्या आई वडिलांनी जसा आपण लहान असताना बालपणात आपला सांभाळ केला, आपली काळजी घेतली तशी आपली देखील जबाबदारी आहे की आपण देखील त्यांची वृध्दापकाळात काजळी घेऊन सांभाळ करणे महत्वाचे आहे. कारण मिळकतीतर आपण किती पण कमवून विकत घेऊ शकतो परंतु आईवडील पुन्हा भेटत नाही. त्यामुळे मुलांनी देखील आई वडील हयात आहेत तोपर्यंत मिळकत आई वडिलांच्याच नावाने राहू दिलेले चांगले.
आई वडिलांना / ज्येष्ठांना प्रश्न पडतो की ते हयात आहेत तोपर्यंत कोणत्याप्रकरे मिळकत मुलांच्या नावे हस्तांतर करून द्यावी आणि कोणत्या मार्गाने व कधी मिळकत मुलांच्या नावे हस्तांतर करावी. बक्षिसपत्र करावे का मृत्युपत्र करावे ? चला तर मग आपण त्याबाबत माहिती बघू.
मुलांच्या नावे मिळकत हस्तांतर करणे हा एक महत्वाचा निर्णय आहे. त्यामुळे घाई न करता अत्यंत विचारपूर्क निर्णय घेणे महत्वाचे आहे. कोणताही निर्णय फक्त भावनेच्या भरात न घेता विचार करून घेणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे भविष्यात अडचण येऊ शकते आणि पश्चात्ताप होऊ शकतो.
बक्षिसपत्र आणि मृत्युपत्र -
बक्षिसपत्र केले तर मिळकत ही लगेच हस्तांतर होत असते. बक्षिसपत्र हे कायद्याने नोंदणीकृत असणे गरजेचे आहे तरच मिळकत हस्तांतर होईल. अथवा बक्षिसपत्र नोंदणीकृत नसेल तर मिळकत हस्तांतर होण्यास अडचण येईल. याउलट मृत्यपत्र केले तर मृत्युपत्र करणार यांच्या मृत्यूनंतर ती मिळकत हस्तांतर होते. त्यामुळे मृत्युपत्र हे मृत्युपत्र करणार यांच्या मृत्यूनंतर अमलात येत असते. मृत्युपत्र हे नोंदणीकृतच असले पाहिजेल असे काही नाही. परंतु भविष्यात वारसांमधे काही वाद होऊ नये म्हणून नोंदणीकृत असलेले कधी ही चांगले. मृत्युपत्र करणार हयात असेपर्यंत ते कधीपण आणि कितीपण वेळेस त्यात बदल करू शकतात. रद्द करू शकतात किंवा काही राहिले तर पुरवणी मृत्युपत्र करू शकतात.
मृत्युपत्र किंवा बक्षिसपत्र करण्यापूर्वी एक गोष्ट तपासून घेणे महत्वाची आहे की जी मिळकत हस्तांतर करणारा आहेत ती स्वकष्टार्जित आहे की वडिलोपार्जित आहे. कारण स्वकष्टार्जित मिळकत असेल तर ती कोणालपण हस्तांतर करता येते. परंतु वडिलोपार्जित असेल तर त्या मिळकती मधे हस्तांतर करणार यांचा जितका हिस्सा आहे तेव्हढाच ते हस्तांतर करू शकतात.
जेव्हा बक्षिसपत्र किंवा मृत्युपत्र केले जाते तेव्हा सर्व मुलांना तसेच मुलींना काय दिलेले आहे ते नमूद करावे. आधी काही दिले असेल ते देखील नमूद करून द्यावे. कारण नंतर बऱ्याचदा का आई वडील काय करतात की प्रत्येकाला वेगवेळी मिळकत देता. वेळोवेळी कोणाला काही ना काही दिले असते, जसे मुलींना लग्नात काही दिलेले असेल. नंतर कोणाला स्थावर मिळकत, कोणाला सोने दागिने, कोणाला दुकान वगैरे आई वडिलांना जसे योग्य वाटते, त्यांच्या हिशोबाने जसे योग्य असेल ते देतात. त्यांनी आधी काही दिले असेल तर ते पण नमूद करून द्यावे. कारण त्यामुळे माहिती राहते दिसून येते की सर्वांना काही ना काही दिलेले आहे. फक्त एकाच नाही दिलेले आहे. असे नमूद करणे अनिवार्यं तर नाही परंतु नमूद केले चांगले राहील. त्यामुळे दिसून येईल की आईवडिलांनी सर्वांना काही न काही दिलेले आहे. तसेच बक्षिसपत्रात नमूद करावे की मिळकत ज्याला दिलेली आहे तो भविष्यात आई वडिलांचा सांभाळ करणार आहे त्याची काळजी घेणार आहे.
बक्षिसपत्र करावे की मृत्युपत्र.
बक्षिसपत्र करावे की मृत्युपत्र करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तसेच मिळकत कोणाला हस्तांतर करावी, कधी हस्तांतर करावी, कशी हस्तांतर करावी हा देखिल ज्याचा त्याचा वैक्तिक प्रश्न असतो. कारण माणसाने जे काही कमावलेले असते ते स्व:कष्टातून कमविलेले असते. त्यामुळे हा स्वतःचा प्रश्न आहे. परंतु तुम्हाला बक्षिसपत्र किंवा मृत्यूपत्राने मिळकत हस्तांतर करणे असेल तर या पोस्ट मुळे तुम्हास माहिती मिळेल.
आई वडिलांनी बक्षिसपत्रापेक्षा मृत्युपत्र केलेले कधी ही चांगले राहू शकते. कारण भविष्यात दुर्दैवाने परिस्थिती बदलली सुना आल्यात, मुलांबरोबर पटले नाही, मुलांनी सांभाळ केला नाही तर ज्येष्ठांना त्याची मिळकत आधार राहील. भविष्यात उदरनिवासाठी पैसे किंवा साधन नसेल, किंवा ज्येष्ठांना औषोधोचारासाठी पैसे लागत असतील तर अशा वेळेस ज्या काही अतिरिक्त मिळकती आहे त्या भाड्याने देऊन, बँकेस गहाण देऊन किंवा विक्री करून पैसे मिळू शकतात. मिळकत शेवटपर्यंत त्यांचीच राहते. गरज वाटल्यास मृत्यूपत्रामधे हयात असेपर्यंत कधीपण बदल करू शकतात.
मिळकत आणि महत्वाचा आर्थिक व्यवहार ज्येष्ठांच्या हातात असल्याने त्यांना त्याचा अभिमान वाटेल. कुटुंबात ज्येष्ठांना अनुभव असल्याने महत्वाचे आर्थिक निर्णय अनुभवातून घेण्यास मदत होते. आणि मृत्युपत्र केलेलं असल्यामुळे मिळकत ही मृत्यूनंतर हस्तांतर होईल.
बक्षिसपत्र व मृत्युपत्र काहीही केलेले नसेल तर मृत्यूनंतर मिळकत ही वारसा कायद्याने व वारस हक्काने हस्तांतर होईल.
बक्षिसपत्राने किंवा अन्य कायदेशीर मार्गाने जर मुलांना स्थावर मिळकत देऊन टाकली आली त्यांनी वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करत नसतील तर त्यासाठी कायद्याने ज्येष्ठ नागरिकांना त्याबाबत संरक्षण दिलेले आहे. त्यामुळे जरी मुलांना स्थावर मिळकत दिली आणि त्यांनी आई वडिलांचा सांभाळ केला नाही तर आई वडिलांना केस दाखल करून ती मिळकत परत घेता येते.
इतर ब्लॉग पोस्ट
आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७.



