दुकाने अधिनियम कोणासाठी...
ग्राम पंचायतीच्या हद्दीत दुकानांना हा कायदा लागू पडत नाही. पण नगरपालिका, महानगरपालिका यांच्या हद्दीतील दुकान चालविण्यासाठी शॉप अॅक्टच्या अंतर्गत एक विशिष्ट परवाना (लायसंस) घेवूनच दुकान/व्यवसाय चालवणे कायद्याने बंधनकारक आहे. अन्यथा दंड किवा शिक्षा किवा दोन्ही होवू शकतात.
हा परवाना मिळविण्यासाठी शॉप अॅक्टच्या अंतर्गत फॉर्म, 'A' मध्ये आवश्यक ती माहिती म्हणजेच,
१) दुकानाचे नांव
२) दुकान मालकाचे पूर्ण नांव
३) दुकान / व्यवसायाचा पत्ता, टेलीफोन क्र.
४) जागेचे मालकी हक्क / भाडे पावती
५) वीज बील
६) ना हरकत प्रमाणपत्र
७) कर भरल्याचा पावत्या इत्यादी.
दुकानासंबंधी योग्य ती माहिती भरुन संबंधीत अधिकार्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (दुकान सुरु करण्यापूर्वी किवा दुकान सुरु झाल्याच्या ३० दिवसाचे आत)
अर्ज सादर केल्यानंतर, त्याची पोच पावती घ्यावी. संबंधीत विभागाचा निरीक्षक येवून तपासणी करतो आणि आपण दिलेली माहिती सत्य असल्याची खात्री व समाधान झाल्यावर संबंधीत कार्यालयातून योग्य ती सर्व प्रक्रिया पार पडले नंतर आपणांस परवाना प्राप्त होतो.
हा परवाना प्राप्त झाल्यानंतर त्यात काहीही बदल झाल्यास ते ३० दिवसाचे आत लेखी स्वरुपात संबंधीत कार्यालयात सादर करुन पावती घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.
दुकान चालविण्यासाठी प्राप्त झालेल्या परवान्याचे दरवर्षी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पूर्वी योग्य ती फी भरुन नुतनीकरण करणे कायद्याने बंधनकारक आहे. हे नुतनीकरण एकाच वेळी अधिक फी देवून तीन वर्षांचे नूतनीकरण केलेच पाहिजे असे बंधन नाही.
नूतनीकरणाची नोंद ही आपणास दिलेल्या प्रमाण-पत्रावरच होत असल्याने नुतनी-करणाच्या वेळी हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
आपल्या दुकानात किती नोकर किती काळापासून आहेत यावरुन आपणास व्यवसाय कराची आकारणी होते. व्यवसायातील वार्षिक विक्रीवरुन आपणास विक्रीकर लागू पडतो.
व्यवसायातील वार्षिक उत्पन्नावरुन आपणांस आयकर लागू पडतो.
एकंदरीत व्यवसायातील वार्षिक उलाढाला किती यावरुन विविध कायदे लागू पडतात की नाही यासाठी एखादा चार्टड अकाऊंटंट, कायदा सल्लागार, वकीलांचे मार्गदर्शन घेणे केव्हाही चांगले. शक्य असल्यास वार्षिक कराराने त्याच्या ज्ञानाचा उपयोग घ्यावा व व्यवसाय वृध्दी करावी.
शिकवणी, विमा एजन्सी, इ. स्वरुपाच्या व्यवसायाला शॉप अॅक्टनुसार परवानाची गरज नाही. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे वकील, चार्टड अकाऊंटंट, डॉक्टर यांच्या ऑफीस / दवाखाना यांना शॉप अॅक्ट परवान्याची गरज नाही.
दुकान / व्यवसाय चालविण्यासाठी सर्वप्रथम परवाना मिळवावा लागतो त्यास शॉप अॅक्ट म्हणून संबोधल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
दुकानासंबंधी कायदेशीर बाबींची पूर्तता म्हणजेच नेमका शॉप अॅक्ट होय.

.jpg)