७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.
एकच जमीन ५-६ जणांना विक्री केल्याचे गैरव्यवहार बऱ्याच वेळेस उघडकीस आलेले आहेत.
ज्या व्यक्ती कडे स्वत:ची शेतजमीन नाही अशा व्यक्तीला शेतजीमन स्वत:साठी खरेदी करता येत नाही.
घेतलेली जागा जर एन.ए. नसेल तर व तिचा वापर आकृषक कामा साठी करावयाचा असल्यास अशी खरेदी केलेली जागा वेळीच जिल्हाधिकारी (कलेक्टर) / महसूल खाते यांचे कडून बिगर शेती (N.A.) Non Agricultural करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा दंड किंवा शिक्षा व दोन्ही होण्याची शक्यता असते.
१) नागरी क्षेत्राबाहेरील सिटी सर्वे न झालेल्या जमीनीबद्दल कोणत्याही प्रकारचा करार करण्यापूर्वी ७/१२ उतारा घेणे आवश्यक असते.
२) ७/१२ चा उतारा संबंधित तलाठी यांच्या कडे मिळू शकतो. किंवा आता तर ऑनलाईन सुद्धा डिजिटल उतारा आपण काढू शकतो. तलाठी कडे जाण्याची गरज नाही व वेळेची बचत होते.
३) जी जमीन, प्लॉट, घर, सदनिका खरेदी करीत आहात ती विक्री करणाऱ्याचीच आहे का? याची खात्री स्वत: खरेदीदाराने करुन घ्यावी व मगच पुढील व्यवहार करण्या चा निर्णय घावा. त्यासाठी आपण 7/12 उतारे जुन्या महसूल नोंदी, जुने उतारे, कागदपत्रे तपासून घ्यावेत.
४) ७/१२ व सिटी सर्वे मध्ये दाखवलेले व प्रत्यक्षातील जमीनीचे क्षेत्रफळ लांबी व रुंदी बरोबर असल्याची खात्री जागेवर जाऊन करुन घ्यावी. वाटल्यास मोजणी करून घ्यावी. त्या बाबत सौदा पावती मध्ये लिहून घ्यावे. म्हणजे ताबा मोजून मापून घेण्यास काही अडचण येणार नाही.
५) सदर जमीन वर्ग 1 का वर्ग 2 दोन आहे हे उतारा म्हणजे मिळकत पत्रिकेवर नमूद असते ते तपासून घेणे. वर्ग 2 मिळकत असेल तर सादर मिळकत विक्री करणे साठी जिल्हाधिकारी (कलेक्टर) यांची परवानगी घ्यावी लागते.
६) जमीनीवर कोणाचा बोजा / तारण किवा जमीनीसंबंधी कोर्टात वाद चालू आहे का याची खात्री करुनच पुढील चर्चा करावी.
७) एकूण जमीनीवरील काही जमीनीचा तुकडा पाडून खरेदी करु इच्छित असल्यास तत्पूर्वी सदर जमीनीस तुकडे बंदीचा कायदा लागू आहे का ते तपासून पहावे ?
८) ७/१२ मध्ये तुकडा किंवा तुकडे बंदी असा शेरा मारला असल्यास ती जमीन खरेदी करता येत नाही.
९) ज्या व्यक्तीकडून जमीन खरेदी करावयाची आहे त्या व्यक्तीचे नांव, ७/१२ ला कब्जेदार म्हणून नोंद केली आहे का? हे तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच मिळकती वार कोणता झोन तर नाही ना तासुन घेणे.
१0) सदर मिळकत विक्री करणाऱ्या इसमास कशी मिळाली आहे उदा. खरेदिने, वारसा हक्काने याची माहिती घेऊन कागदपत्रे तपासून पाहावे. तसेच इतर कोणाचा काही हक्क नाही ना हे तपासून घ्यावे.
११) कब्जेदार व हक्क यांच्या नोंदी कोणत्या अशा कागदपत्राच्या आधारे करण्यास आलेले फेरफार आहे. ती मुळ कागदपत्रे तपासून खात्री झाल्यावरच खरेदीचा व्यवहार करा
१२) आपल्याला वाटल्यास वकिला कडून सादर मिळकतीचा सर्च रिपोर्ट काढून घ्यावा. त्यामुळे आपल्याला मिळकतीची बरीच माहीत प्राप्त होत असते.
१३) जमीन खरेदी केल्यावर खरेदी खत रजिस्टर केले जाते त्यानंतर त्या खतास इंडेक्स २ चा उतारा जोडून ७/१२ च्या उतार्यावर मालक म्हणून नोंद करुन घेण्यासाठी खरेदी तारखेपासून १८० दिवस किंवा ६ महिनेच्या आत तलाठ्याकडे रितसर अर्ज केला पाहिजे व दस्तऐवज काळजीपूर्वक तयार करुन घेणे आवश्यक आहे.
१४) जमीन खरेदी करण्यासाठी खरेदी चा दस्त तयार करून योग्य ती स्टॅम्प ड्युटी ऑनलाईन भरून Deta Entry करून दस्त नोंदणी करून घ्यावा लागतो.
१5) वारसा हक्काने, बक्षिसरुपाने, किंवा अन्य कोणत्याही मार्गाने जमीनीवर हक्क प्राप्त होत असतील तर त्याची तशी नोंद करुन घेणे आवश्यक आहे. ही नोंद कच्ची व पक्की अशा दोन प्रकारातून असते तर ती नोंद कोणती आहे आधी तपासून घ्यावे.
१6) जमीन खरेदी करण्यापूर्वी जमीनीचा उतारा हा जवळच्या / अलिकडच्या तारखेचा असावा.
१७) जमीनीच्या मालकी हक्कात झालेल्या बदलाची नोंद कोणत्या तारखेला झाली कोणत्या कागदपत्राच्या आधारे झाली कोणास कधी हक्क प्राप्त झाले तसेच हक्कात बदल झाला असल्यास त्या बाबत वेगवेगळी अक्षरे त्यात नमूद केलेली असतात ती तपासून, जाणकार गोल मध्ये लिहतात किंवा स्पष्ट, जाड अशा विशिष्ट अक्षरात नमूद Highlight करतात, की जेणेकरून डोळ्यास स्पष्ट दिसू शकतील. मिळकत खरेदी करणे किंवा वारसा हक्काने बक्षिसपात्र पध्दतीने मिळाल्यावर तीन महिन्याच्या आत न्यायालयातून किंवा संबंधीत कार्यालयातून हक्कांमधील बदलांची नोंद करुन घेण्यासाठी सिटी सर्वे ऑफीसकडे रितसर अर्ज करावा. ७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्डवरील माहिती नोंदीबाबत आक्षेप शंका असल्यास संबंधितांकडे लेखी तक्रार करावी त्याची एक प्रतीवर पोच पावती घ्यावी व ती पावती जपून ठेवावी अन्यथा भविष्यात कटकटी वाढण्याचा संभव असतो.
७/१२ म्हणजे काय?
जमीनी संबंधीचे रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवले जावे. सर्वाना ते समजावे सर्व तसेस समानता असावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गावातील महसूल माहिती ही गांव नमूना १ ते २१ या नमुन्यामध्ये ठेवली जाते त्यातील ७ नंबरच्या नमुन्यात मालकी हक्काबाबतचा आहे तर १२ नंबर हा नमुना पिका संबंधीचा आहे. या दोन्हीचा मिळून ७/१२ असे संबोधण्यात येते व समाजात ७/१२ हाच शब्दप्रयोग रुढ झाल्याने ७/१२ असे म्हणतात.
सिटी सर्वे म्हणजे काय?
सिटी सर्वे नंबर प्लॉट नंबर हा मिळकतीच्या, जमीनीच्या क्षेत्रफळाला फायनली देण्यात येतो की ज्या आधारे आपणास मिळकतीच्या वहीवाट, हक्का संबंधीची माहिती मिळते. तसेच मालकी हक्क धारण करणार याचे नांव व इतर माहिती व हक्क प्राप्त झाला संबंधीचा संपूर्ण माहिती उदा.पट्टेदार कोण आहे. मिळकतीवर कोणाचा बोजा आहे का? मालकी हक्कात वेळोवेळी झालेले बदल, त्यांच्या तारखा कोणत्या कागदपत्राच्या आधारे हे बदल झालेले आहेत इ.
कोणतीही मिळकत खरेदी करतांना विक्री करणाऱ्याला जास्त काळजी नसते तो फक्त पैसे द्या व माझ्या सह्या घ्या असे छातीठोकपणे सांगतो मात्र खरेदीदाराने घाई न करता सर्व व्यवहार काळजीपूर्वक तपासून प्रसंगी वकिल / कायदा सल्लागाराचे मार्गदर्शन घेवून व्यवहार पूर्ण करणे योग्य व दोघांनाही हितावह ठरेल.