भागीदारी संस्थेतील बदल आणि कायदेशीर बाबींची पुर्तता
दंड / शिक्षा होवू नये म्हणून भागीदारी संस्थेस कोणत्या बदलास कोणता फॉर्म भरुन घ्यावा या संबंधीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
१) फॉर्म क्र. A :
जेव्हा भागीदारी संस्थेची नोंदणी करावयाची असते तेव्हा कमीत कमी रु. ५००/- च्या मुद्रांकांवर करार करावा लागतो व कराराच्या पुर्तीसाठी त्यावर सर्व भागीदारांच्या सह्या करणे आवश्यक आहे. सह्या झाल्यानंतर तो मुद्रांक / करारनाम्यावर नोटरी करुन व्यवसाय सुरु झाल्यापासून एक वर्षाचे आत संबंधित कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. सादर करतेवेळी सोबत योग्य ती फी भरावी लागते. हा अर्ज भरण्यास विलंब झाल्यास प्रतिवर्षासाठी विंâवा त्या वर्षातील काही भागांसाठी सुध्दा दंड होवू शकतो.
२) फॉर्म क्र. B:
भागीदारी संस्थेच्या नावांत बदल, भागीदाराच्या व्यवसायाच्या मुख्य पत्त्यामध्ये बदल अथवा भागीदारी संस्थेच्या स्वरुपातच बदल झाला असेल किवा करणार असाल तर हा फॉर्म भरुन निर्धारित वेळेत घ्यावा लागतो. सदर अर्ज हा भागीदारीमध्ये बदल झाल्या दिवसापासून ३ महिन्याचे आत संबंधित कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे असा अर्ज दाखल करतांना अर्जासोबत योग्य ती फी (अल्पशी फी असते १५/-) देखील भरावी लागते यात दिरंगाई केल्यास, दिरंगाई झालेल्या प्रत्येक दिवसात (रु. १०/-) दंड होवू शकतो, असा अर्ज दाखल करतांना त्यावर प्रत्येक भागीदारांची सही ही आवश्यक आहे या संदर्भातील तरतुद कायद्याच्या कलम ६० (१) व ६० (१ हे) १ A मध्ये केलेली आहे. त्या सह्या नोटरी मार्फत प्रमाणित करणे आवश्यक आहे.
३) फॉर्म क्र. C :
हा फॉर्म व्यवसायाच्या शाखेची सुरुवात करतांना किंवा जुनी शाखा बंद करतांना भरावा लागतो व त्यामध्ये कोणत्या तारखेपासूनचा उल्लेख हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा फॉर्म संबंधित तारखेपासून ९० दिवसाचे आत संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचे आहे. अन्यथा उशीर झालेल्या प्रत्येक दिवसाला रु. १०/- दंड आकारण्यात येतो. सोबत शुल्क म्हणून योग्य ती फी रु. १५/- भरणे आवश्यक आहे. या फॉर्म संबंधिताच्या तरतुदी कलम ६१ व ६९ A मध्ये नमुद करण्यात आल्या आहेत.
४) फॉर्म क्र. D :
भागीदारी संस्थेच्या भागीदारांच्या नावांत किवा पत्त्यात बदल झाला तर हा फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म देखील संबंधित तारखेपासून तीन महिन्याच्या आत संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रतिदिनाप्रमाणे योग्य तो रु. १०/- दंड आकारण्यात येतो. अर्ज सादर करतांना योग्य ते शुल्क रु. १५/- जमा करणे आवश्यक आहे. या संदर्भातील तरतुदी या कलम ३२ व ६९ A मध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत. निर्धारीत वेळेत फॉर्म जमा न झाल्यास योग्य ती तरतुद करण्यात आलेली आहे.
५) फॉर्म क्र. E :
भागीदारी संस्थेच्या घटनेत बदल विंâवा भागीदारी संस्थेचे विलीनीकरणाच्यावेळी हा फॉर्म सादर करावा लागतो संबंधित तारखेपासून ९० दिवसाचे आत संबंधित कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा दंड होवू शकतो. या संदर्भातील तरतुदी या कलम ६३ (१) व ६९ A मध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत.
६) फॉर्म क्र. F :
एखादी अज्ञान व्यक्ती ही भागीदारी संस्थेत असेल आणि ती सज्ञान झाल्यावर भागीदारी संस्थेत राहावयाचे की नाही या संदर्भातील माहितीसाठी हा फॉर्म देखील ९० दिवसांचे आतच संबंधित कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे व त्याची तरतुद ही कलम ६३ (२) ६९ A मध्ये करण्यात आलेली आहे.
भागीदारी संस्था स्थापनेच्या वेळी संबंधित निबंधकांनी नांव नामंजूर केल्यास त्याचे विरुध्द अपील हे हुकूमनामा मिळाल्यापासून ३० दिवसाचे आत करावा लागतो.
भागीदारी संस्थेच्या संदर्भात दिलेल्या माहितीमध्ये काही चुक झाली तर ती दुरुस्त करुन त्यावर सर्व भागीदाराच्या सह्या लागतात.
कायदेशीर बाबींची पुर्तता वेळेवर करणे केव्हाही चांगले असते तेव्हा वेळीच विधी तज्ञांचा सल्ला घ्यावा व कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही याची दक्षता वेळीच घेणे योग्य.

